सांगली : स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडामुळे पर्यावरणाची हानी होते. यावर पर्याय म्हणून संवेदना फाउंडेशनने गायीच्या शेणापासून तयार केलेल्या लाकडाच्या तुकड्याद्वारे अंत्यसंस्कार करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांना दिला आहे. महापालिका हा पथदर्शी प्रकल्प राबविणार आहे.मृतदेहाच्या दहनासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या लाकडांमुळे वायुप्रदूषण वाढले आहे. यावर दरवर्षी लाखोंचा खर्चही होतो. त्यामुळे महापालिका आता ‘गो कास्ट’द्वारे शवदहनाचा प्रयोग करणार असून संवेदना फाउंडेशन यासाठी गो कास्टचा पुरवठा करणार आहे. यामुळे प्रदूषण रोखता येणार आहे. आयुक्त सुनील पवार यांना संवेदना फाउंडेशनने याबाबतचा प्रस्ताव दिला आहे.फाउंडेशनचे प्रमुख रौनक शहा यांनी सांगितले की, ‘गो कास्ट’ वापरून शवदहन केल्यास लाकडांपेक्षा कमी वेळात शवदहन होते. याचबरोबर लाकडापासून होणारे प्रदूषण रोखता येते.यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त राहुल रोकडे उपस्थित होते. गो कास्टद्वारे शवदहनाचा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यास यासाठी आवश्यक लोखंडी जाळ्या बसविल्या जाणार असून आवश्यकतेनुसार गो कास्ट मागवून शवदहन करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.
शेणाच्या लाकडातून सांगलीत शवदहन, महापालिका पथदर्शी प्रकल्प राबविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 4:43 PM