इस्लामपूर : गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे लग्न समारंभात फक्त ५० निमंत्रिकांना उपस्थित राहण्याची मर्यादा होती. आता कोरोनाची लाट ओसरल्यानंतर लग्नसोहळे धुमधडाक्यात सुरू झाले आहेत. येथील एका कुटुंबातील मुलाच्या लग्नपत्रिकेत तब्बल साडेतीनशेवर निमंत्रकांची नावे छापली आहेत. हा सध्या शहरातील चर्चेचा विषय बनला आहे.येथील वराचा विवाह पुण्यातील वधूशी दि. २२ मे रोजी इस्लामपूर येथे होत आहे. त्यांची भलीमोठी लग्नपत्रिका छापली आहे. यामध्ये पै-पाहुणे, खास निमंत्रितांची तब्बल साडेतीनशे नावे आहेत. पत्रिकेत लग्नासाठी आमंत्रित करणाऱ्या ५६ नावांचा समावेश केला आहे, तर तीनशेहून अधिक निमंत्रित पै-पाहुण्यांच्या नावांनी पत्रिका भरगच्च झाली आहे. या निमंत्रणपत्रिकेची चर्चा या परिसरात आहे. प्रत्येक निमंत्रिताच्या मागे किमान दोन ते तीन लोक लग्नासाठी येण्याचे गृहित धरले आहे.कोरोनाच्या कालावधीत अल्प खर्चात लग्नसमारंभ उरकले गेले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. शासनाच्या अटीही शिथिल झाल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लग्नसमारंभ होऊ लागले आहेत. काहीजण लग्नपत्रिकेवरचा खर्च टाळण्यासाठी व्हॉट्सॲपचा उपयोग करतात. परंतु या वरपित्याने लग्नपत्रिकेत तब्बल साडेतीनशेवर निमंत्रकांची नावे छापली आहेत. त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
जाऊदे झाडून! लग्नपत्रिकेत चक्क साडेतीनशे निमंत्रकांची नावे, इस्लामपुरात एकच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 1:54 PM