सांगली : घरपट्टीच्या थकबाकीदार मालमत्ताधारकांची यादी तयार करून घर टू घर वसुली मोहिम राबविण्याबरोबरच बड्या थकबाकीदारांची यादी चौकात लावली जाणार आहे. महापालिकेतील बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला.स्थायी समितीचे सभापती धीरज सूर्यवंशी, उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत घरपट्टी विभागाची बैठक झाली होती. बैठकीला सभागृह नेते विनायक सिंहासने, सहाय्यक आयुक्त नितीन शिंदे, नगरसेवक संजय कुलकर्णी, प्रकाश ढंग उपस्थित होते.सूर्यवंशी म्हणाले, महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. विकासकामाबरोबरच पगारालाही निधी कमी पडत आहे. त्यासाठी घरपट्टी वसुलीची मोहिम हाती घ्या. प्रत्येक भागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वसुलीचे टार्गेट द्या, लोक कर भरायला तयार आहेत, त्यांना जागेवरच पावती हवी असते. त्यासाठी आधुनिक तंज्ञांचा वापर करुन कर वसुलीवर भर द्यावा. बड्या थकबाकीदारांचे फलक चौकात लावण्याची सूचनाही त्यांनी केली.उपायुक्त राहुल रोकडे म्हणाले, प्रत्येक प्रभागाचे कर वसुलीचे टार्गेट ठरवून नियोजन करा. कर्मचार्यांना अडचणी सोडविल्या जातील. घंटागाडीवरुनही घरपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.नितीन शिंदे म्हणाले, महापालिकेचा पगार घेऊन काम करतो. कर वसुली करताना तशी तळमळ दिसू द्या. प्रत्येक प्रभागातील कर्मचार्याने बड्या थकबाकीदारांची यादी तयार करावी. मिरजेतील आंबेडकर उद्यान, सांगलीतील विजयनगर, सांगलीवाडी, बापट मळा, प्रभाग समिती दोनचे कार्यालय या ठिकाणी घरपट्टी संकलनाचे कार्यालय सुरु केले आहे.
केवळ ११ कोटीची वसुलीमहापालिकेची मार्चअखेर ११० कोटीची कर वसुलीचे उद्दीष्ट आहे. २० सप्टेंबर अखेर केवळ ११ कोटीची वसूली झाली आहे. ६१ कोटी थकबाकी, तर चालू मागणी ४८ कोटी आहे.