आष्टा : जातपंचायत भरविणार नाही, पोरांनी आंतरजातीय विवाह केले, तरी बहिष्कार टाकणार नाही, अशी ग्वाही नंदीवाले समाजाने दिली. आष्टा येथे अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पोलिसांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत अनेक जुन्या रूढी-परंपरांना मूठमाती देण्याची तयारी समाजातील सदस्यांनी दर्शविली.‘अंनिस’चे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याची माहिती दिली. ते म्हणाले, कोणत्याही कारणाने कोणालाही वाळीत टाकता येणार नाही. जातपंचायत बसवता येणार नाही. दंड ठोठावता येणार नाही. आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना समाजातून बहिष्कृत करता येणार नाही. कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई होऊ शकते. अनिष्ट, अघोरी प्रथा बंद करायला हव्यात. जात पंचायतीच्या नावे सुरू असणारी समांतर न्यायव्यवस्था बंद करून करावी.सहायक पोलिस निरीक्षक अण्णासाहेब बाबर यांनीही कायदेशीर तरतुदींची माहिती दिली. सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन केले. ‘अंनिस’च्या कार्यकर्त्या सीमा पाटील म्हणाल्या, समाजातील तरुणांनी जातपंचायतीसारख्या अन्यायी व्यवस्थेविरुद्ध आवाज उठविला पाहिजे. बैठकीला उपनिरीक्षक उदयसिंग काळे, ‘अंनिस’च्या डॉ. सविता अक्कोळे, जगदीश काबरे, प्रा. खडसे आदी उपस्थित होते.
लेखी निवेदन काढणारनंदीवाले समाजाच्या सदस्यांनी सांगितले की, अंनिस आणि पोलिसांच्या आवाहनानुसार अनिष्ट परंपरा बंद केल्या जातील. जातपंचायत भरविणार नाही. कोणालाही वाळीत टाकणार नाही. मुला-मुलींनी आंतरजातीय विवाह केले, तरी समाजात सामील करून घेऊ. समाजातील सर्व घटकांशी चर्चा करून लेखी निवेदन जाहीर करू.