कुंडल : क्रांतिसिंह नाना पाटील, डॉ. जी. डी. बापू लाड यांचे केवळ कौतुक करण्यापेक्षा त्यांच्या जीवनाचे अनुकरण केल्यास खरी आदरांजली ठरेल. त्यांचे विचार सोबत घेऊन मी जातोय, असे प्रतिपादन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.कुंडल (ता. पलूस) येथे सोमवारी शिंदे यांना आमदार अरुण लाड, साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांच्या हस्ते क्रांतिअग्रणी पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.शिंदे म्हणाले, मला बोलण्यापेक्षा काम करायला आवडते. आजवर अनेक दिग्गजांना हा पुरस्कार मिळाला, त्यांच्या बरोबरीने मलाही दिला गेला यामुळे स्वत:ला भाग्यवंत समजतो. आजवर चित्रपटातील भूमिकांतून सामाजिक खदखद व्यक्त केली. जगण्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनसाठी सह्याद्री देवराई संस्था स्थापन केली. आजवर कोणी अभिनेता, खेळाडूने सावलीसाठी, ऑक्सिजनसाठी प्रयत्न केला आहे का? त्यांनी केवळ जनसामान्यांच्या भावनांशी खेळून पैसा कमविला. पुढील पिढीसाठी शुद्ध हवेचे स्रोत तयार करणे, हे आपले कर्तव्य आहे.
प्रमुख पाहुणे डॉ. राजन गवस म्हणाले, आजच्या पिढीला वृक्षांचे महत्त्व समजले नाही. ही पिढी कसले शिक्षण घेत आहे? सयाजी शिंदे वादळात दिवा लावत आहेत. त्यांना मिळालेला पुरस्कार प्रेरणा देईल.
अशोक पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. पी. बी. लाड यांनी मानपत्र वाचन केले. श्रीकांत माने यांनी सूत्रसंचालन केले. अर्जुन कुंभार यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, उद्योजक उदय लाड, क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, व्ही. वाय. पाटील, बाळासाहेब होनमोरे, दादासाहेब ढेरे, पृथ्वीराज कदम, न्यायमूर्ती अरुण लाड आदी उपस्थित होते.
दत्तभक्तांना वृक्षप्रसाद द्या!औदुंबर येथील दत्त मंदिरात भक्तांना स्वरूपात देशी वृक्ष देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा सयाजी शिंदे यांनी आमदार अरुण लाड यांच्याकडे व्यक्त केली. वड आणि पिंपळ ही देशी झाडे कोणत्याही कारणास्तव तोडली जाऊ नयेत, यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न व्हावेत, असेही ते म्हणाले.
राजकारण्यांना पुरस्कार नाहीअरुण लाड म्हणाले, चळवळीतून समाज घडविणाऱ्यांना प्रेरणेसाठी हा पुरस्कार दिला जातो. आजवर कोणीही राजकारण्याला किंवा सामाजिक भूमिका सोडून पुरस्कार दिलेला नाही.