सांगली : चेंबर ऑफ काॅमर्सच्या निवडणुकीत प्रथमच वेगवान घडामोडी घडत आहेत. प्रस्तापित नेतृत्वाच्या विरोधात बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापाऱ्यांनी बंड करून धक्का दिला. बाजार समिती निवडणुकीतील यशस्वी पॅटर्नचा चेंबरच्या निवडणुकीतही सुशिक्षित तरुण आणि ज्येष्ठ व्यापाऱ्यांनी एकत्र येत विरोधकांना घाम फोडल्याची व्यापाऱ्यांत चर्चा रंगली आहे.चेंबर ऑफ कॉमर्स ही नामांकित संस्था असून, बहुतांशीवेळा निवडणूक बिनविरोध झाली आहे. पण, सत्ताधाऱ्यांच्या कारभाराविरोधात सुशिक्षित तरुण आणि ज्येष्ठ व्यापाऱ्यांमध्ये असंतोष होता. हा असंतोष सांगली बाजार समितीच्या निवडणुकीतही व्यापाऱ्यांनी व्यक्त करून चेंबरचा एक उमेदवार पराभूत केला. बाजार समितीच्या निवडणुकीतील असंतोष चेंबरच्या निवडणुकीतही व्यापारी व्यक्त करताना दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी गटात सुशिक्षित व्यापारी उभा राहिल्यामुळे निवडणूक लक्षवेधी ठरली आहे.सत्ताधारी विकासकामाच्या जोरावर आमचाच विजय असल्याचे ठणकावून सांगत आहेत. विरोधकांनी सत्ताधारी गटातील नाराजांना बरोबर घेऊन तरुण आणि ज्येष्ठ व्यापाऱ्यांना उमेदवारीची संधी देऊन सत्ताधाऱ्यांसमोर तगडे आव्हान उभा केले आहे. या सत्ताधाऱ्यांना काही राजकर्त्यांनीही छुपा पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. १० ऑक्टोबरला मतदान होणार असून, या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्व व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सत्ताधारी व्यापारी एकता पॅनलचे उमेदवारअण्णासो चौधरी, दीपक चौगुले, अमरसिंह देसाई, सचिन घेवारे, केतन खोकले, मनीष कोठारी, अभय मगदूम, बाळासो पाटील, आप्पासो पाटील, हरिश्चंद्र पाटील, शरदचंद्र शहा, समीर साखरे, राहुल सावर्डेकर.
व्यापारी विकास आघाडी उमेदवारअविनाश अट्टल, रोहित आरवाडे, रवींद्र चिवटे, राजेश खवाटे, विकास मोहिते, संदीप मालू, श्रीगोपाल मर्दा, मुकेश पटेल, बाळासाहेब पाटील, विपुल पाटील, अशोक पाटील, प्रशांत सावर्डेकर.
व्यापाऱ्यांमध्ये असंतोष का?- जीएसटीचा प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष- व्यापाऱ्यांना पोलिस संरक्षण देण्याऐवजी व्यापाऱ्यांकडून पैसे का उखळले?- प्रशासनाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांची आर्थिक लूट कुणी केली?- नवीन व्यापाऱ्यांना नेतृत्वाची संधी टाळली जात असल्याचा आरोप
चेंबरने अनेक प्रश्न सोडविलेचेंबर ऑफ काॅमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र आणि राज्य शासनाकडे प्रश्न मांडल्यामुळे जीएसटीचा प्रश्न सोडविला. अनेक प्रश्न चेंबरने सोडविल्यामुळे बाजारपेठेचा विकास झाला आहे. याकडे विरोधकांनी दुर्लक्ष करून चालणार नाही, असा सवाल सत्ताधारी नेत्यांनी केला आहे.