जत : देशाच्या राज्यघटनेत बाबासाहेबांनी लिहिलेल्या कलमांची संख्या कमी होत चालली आहे. सर्वसामान्यांचे दलित व मागास प्रवर्गातील हक्काचे शिक्षण संपत चालले आहे. मूलभूत अधिकारावर गदा आणली जात आहे. ज्या व्यवस्थेने मोठ्या पदावर बसण्याची संधी दिली, ती सुरक्षित ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी आपली आहे. त्याला लाथाडले तर पुन्हा समाजाला न्याय देण्यासाठी नवा आंबेडकर मिळणार नाही, असे प्रतिपादन ऑल इंडिया बुद्धिस्ट सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी केले.जत येथे मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण राज्याचे कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. राजरत्न आंबेडकर बोलत होते. यावेळी बसपाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप तांजणे, दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार, बसपाचे माजी केंद्रीय सचिव राहुल सरवदे, संजीव सदाफुले, खासदार संजय पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, ॲड. सी. आर. सांगलीकर, माजी आमदार विलासराव जगताप, सुरेश शिंदे, डॉ. रवींद्र आरळी, विवेक कांबळे, प्रकाश जमदाडे, तम्मनगौडा रवी-पाटील, अमोल डफळे, सरदार पाटील, डॉ. कैलास सनमडीकर यांची प्रमुख उपस्थिती हाेती. सुरेश खाडे म्हणाले, या तालुक्यातील माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आमदार, कामगार मंत्री बनू शकला, ते फक्त बाबासाहेबांच्या घटनेमुळे. त्यांचे समाजातील प्रत्येक घटकावर उपकार आहेत. हे कधीच विसरू चालणार नाही. त्यांच्या विचाराचा पाईक म्हणून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम करू. खासदार पाटील म्हणाले, बाबासाहेबांनी देशाला दिलेले संविधान अनमोल आहे. त्याच्या माध्यमातून देशातील प्रत्येक घटकाला त्यांनी न्याय दिला. संजय कांबळे यांनी प्रास्ताविक केले. अतुल कांबळे यांनी स्वागत केले. संतोष ऊर्फ भूपेंद्र कांबळे यांनी आभार मानले.अधिकारी घडावेतडॉ. आंबेडकर म्हणाले, जतमध्ये बाबासाहेबांचा पुतळ्याचे अनावरण होत आहे. त्यामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. या पुतळ्याच्या दहा किलोमीटर अंतरात आयएएस, आयपीएस अधिकारी निर्माण झाले तरच या लोकार्पणाला अर्थ आहे.
बाबासाहेबांच्या राज्यघटनेतील कलमांची संख्या कमी हाेतेय - डॉ. राजरत्न आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 5:30 PM