सांगली : तुल्यबळ लढतींमुळे संपूर्ण राज्यभर लक्षवेधी ठरलेल्या सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात एकूण सरासरी ७१.५७ टक्के मतदान झाले. निवडणूक रिंगणातील प्रमुख उमेदवारांसह ९९ जणांचे भवितव्य आता मतदान यंत्रात बंद झाले असून २३ नोव्हेंबरला निकाल हाती येणार आहे. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली.आमदारकीची माळ गळ्यात पडावी म्हणून अनेकांनी यंदा प्रतिष्ठा पणाला लावली होती. जादा आमदार निवडून आणून राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्नही जिल्ह्यातील नेत्यांकडून झाला. या सर्वांचे लक्ष मतदान प्रक्रियेकडे लागले होते. गेल्या दोन दिवसांपासून छुप्या राजकीय हालचालींना वेग आला होता. मतदान प्रक्रियेवरही नेत्यांनी ‘वॉच’ ठेवला होता.जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले तर सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले. त्यामुळे वाढलेल्या टक्क्यांचे व घसरलेल्या मतदानामुळे निकालावर काय परिणाम होणार यावरून आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत.आचारसंहिता भंगाच्या किरकोळ तक्रारी वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.काही ठिकाणी मतदान वेळेत पूर्ण झाले तर काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत रांगा दिसत होत्या. मतदान प्रक्रिया सुरू असतानाही फेक न्यूजच्या तक्रारींचा पाऊस पडला. सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपही सुरूच राहिले. त्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. तरीही प्रत्यक्ष वादाचे प्रसंग कुठेही उद्भवले नाहीत.
२०१९ मध्ये ६७.३९ टक्के मतदानसांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये ६७.३९ टक्के मतदान झाले होते. यंदा त्यापेक्षा मतदान अधिक होईल असा अंदाज होता. मात्र मतदान जागृतीचा फारसा परिणाम दिसून आला नाही. शहरी भाग अधिक असलेल्या सांगली व मिरज मतदारसंघात मागील निवडणुकांप्रमाणे कमी मतदान नोंदले गेले.
नेत्यांची अस्वस्थता वाढलीमतदान प्रक्रिया संपताच आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकाल काय लागणार याच्या विचाराने निवडणूक रिंगणातील प्रमुख उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. मतदान यंत्रणातून निकालाचे कल लागेपर्यंत त्यांच्यातील अस्वस्थता कायम राहण्याची चिन्हे आहेत.