सांगली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतल्या जाणाऱ्या नीट २०२४च्या परीक्षेचा निकाल नियोजित तारखेच्या आधीच घोषित करण्यात आला. विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या, इतर वर्षाच्या तुलनेत सोपा गेलेला पेपर यामुळे विद्यार्थ्यांना भरभरून गुण मिळाले आहेत. त्यामुळे नीटचा कट ऑफ वाढलेला असून वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग विद्यार्थ्यांसाठी खडतर झाला आहे.
यावर्षी वैद्यकीय प्रवेशासाठीचा कटऑफ गतवर्षीपेक्षा खूप जास्त राहण्याची शक्यता आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक पात्रता गुण देखील गतवर्षीपेक्षा यंदा वाढलेले आहेत. खुल्या आणि ईडब्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेत किमान १६३ गुण, तर याच प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना १४६ गुणांची आवश्यकता आहे. इतर मागास (ओबीसी), अनुसूचित जाती (एस. सी.), अनुसूचित जमाती (एस. टी.) आणि याच सर्व प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना १२९ गुणांची आवश्यकता आहे.
६३ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी
यावर्षी ७२० पैकी ७२० गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६३ इतकी आहे. ही संख्या विक्रमी आहे. याशिवाय साडे सहाशेचा पल्ला ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही यंदा सर्वाधिक आहे.
महाराष्ट्रात १,४२,६६५ विद्यार्थी पात्र
महाराष्ट्रातील नीटच्या विद्यार्थ्यांची २०२३ मधील संख्या २ लाख ८२ हजार ५१ तर २०२४ मध्ये २ लाख ७५ हजार ४५७ इतकी होती. संपूर्ण भारतातून वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची यावर्षीची संख्या १३ लाख १६ हजार २६८ इतकी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यात १ लाख ७० हजारांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पात्र विद्यार्थ्याची संख्या १ लाख ४२ हजार ६६५ इतकी आहे. गतवर्षी १ लाख ३१ हजार विद्यार्थी महाराष्ट्रातून पात्र ठरले होते.यावर्षी गुणांचा विचार केल्यास ऑल इंडिया रँक खूपच वाढलेला आहे. महाराष्ट्रातील मेरीट लिस्टनुसार विद्यार्थ्यांचा क्रमांक, कॅटेगरी रँक, वाढणारी महाविद्यालये आणि जागांची संख्या यावर तसेच महाराष्ट्रातील जे विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यातून प्रवेश घेतील त्यांची संख्या आणि पुढील वर्षीच्या रिपीटर विद्यार्थ्यांची संख्या यावर महाराष्ट्राचा कटऑफ ठरेल. विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती घेऊनच अर्ज करावेत.- डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली