सांगली : बिसूर (ता. मिरज) येथे पाटील कुटुंबियांच्या आजी-आजोबांनी लावलेली पिंपर्णी वयोमानाने म्हातारी झाली. जर्जर अवस्थेत कशीबशी मुळे रोवून होती. पण कालच्या उन्हाळ्यात जोरदार वाऱ्यावादळात तिचे पाय डळमळले. वृद्धत्वामुळे न झेपणारा डोलारा अखेर शांतपणे जमिनीवर टाकला. पाटील कु टुंबियांनी तिचे पुनर्रोपण करत पुन्हा जीवदान दिले.१४३ वर्षे पिंपर्णी ऊन-पावसाचे तडाखो सोसत हळूहळू धराशायी झाली. पण तिच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या पाटील कुटुंबियांना तिच्यामध्ये आजी-आजोबांचे अस्तित्व दिसत होते. पिंपर्णीने हार मानली, पण त्यांनी धीर सोडला नाही. मोठी यातायात करुन परत उभे केले. जमिनीत रुजवले. गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या खटपटीला यश येऊ लागले. सध्या पिंपर्णी पुन्हा उभी राहू पाहत आहे. आकाशात झेपावू पाहत आहे.बिसूरमध्ये गावापासून किलोमीटरभर अंतरावर पाटील कुटुंबियाची शेती आहे. शेतात बांधावर त्यांच्या पूर्वजांनी सन १८८० मध्ये पिंपर्णीचे झाड लावले होते. तिच्या सोबतीनेच कुटुंबातील तीन-चार पिढ्याही मोठ्या झाल्या. १४३ वर्षे उन्हाळे-पावसाळे पाहिलेली पिंपर्णी हल्ली कमकुवत झाली होती. मे-जून महिन्यात जोरदार वाऱ्यात ती एका बाजुला कलली. मुळे जमिनीबाहेर आली. पाटील कुटुंबातील विश्वास पाटील यांनी तिला पुनर्जीवन देण्याचा निर्णय घेतला. नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीचे अमोल जाधव, प्रवीण शिंदे, अरविंद सोमण आदींनी मदत केली. त्याचा फायदा झाला. सध्या झाड पुन्हा उभे राहिले असून तग धरु लागले आहे. कुटुंबियांच्या प्रेमाने काही दिवसांतच पुन्हा बहरेल. पुढील पिढ्यांना पर्यावरणाचा संदेश देत राहील.
फांद्या छाटून बोजा कमी केलाविश्वास पाटील यांनी वृक्षप्रेमी व पर्यावरण तज्ज्ञांशी सल्लामसलत केली. त्यांच्या सल्ल्याने पिंपर्णीचे पुनर्रोपण केले. त्यासाठी हजारो रुपयांचा खर्चही केला. मुळे पुन्हा रुजण्यासाठी पुरेशी माती, रसायने वापरली. झाडाचा बोजा कमी करण्यासाठी एका बाजूच्या फांद्याही छाटल्या. त्यामुळे झाडाला जणू नवा आत्मविश्वास मिळाला आहे.