शरद जाधवभिलवडी : वारंवार येणारा महापूर व कोरोनाच्या संकटाशी दोन हात करणाऱ्या पलूस तालुक्यातील जनतेला इतिहासातील काळ्या पाण्यापेक्षाही गंभीर अशा हिरव्यागार मळीमिश्रित पाण्याची शिक्षा भोगावी लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून नदीकाठच्या गावात साथीच्या रोगांचा फैलाव वाढला आहे. प्रशासनातील अधिकारी आणि नेतेमंडळींना याो काहीच सोयरसुतक नसल्याचे चित्र दिसत आहे.डेंग्यू, चिकुननिया, गॅस्ट्रो, ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, आदी साथीच्या आजारांचा फैलाव झाला आहे. भिलवडी, माळवाडी, अंकलखोप, औदुंबर, नागठाणे, रामानंदनगर, बुर्ली, आमणापूर, नागराळे, धनगाव, सुखवाडी, खटाव, ब्राह्मनाळ, वसगडे, दह्यारी, घोगाव, पुणदी, आदी गावांना कृष्णा नदीमधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. हे पाणी दूषित असल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. मळीमिश्रित पाणी आणि सतत बदलत्या हवामानामुळे रुग्ण वाढत आहेत.कृष्णा नदीतील पाणीपातळी खालावली आहे. त्यातच वरचेवर मळीमिश्रित पाणी सोडल्याने नदीपात्र हिरवेगार बनले आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे याकडे दुर्लक्ष आहे. जिल्हा प्रशासनाने आणि मंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
मळीमिश्रित पाण्याने कृष्णाकाठची जनता त्रस्त, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 1:28 PM