सांगली : जे जातीय, धार्मिक तेढ निर्माण करु पाहतात, अशा लोकांना पुरोगामी महाराष्ट्रातील जनता कधीही थारा देत नाही, असे मत राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर. आर. पाटील यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.सांगलीत कॉलेज कॉर्नरवरील शिवजयंती उत्सवासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पाटील यांनी अभिवादन केले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले की, हल्ले हे नेहमी शक्तीस्थळांवरच केले जातात. शरद पवार हे महाराष्ट्राचे नेतृत्व करतात. ते सर्वांसाठी शक्तीस्थळ असल्याने त्यांच्यावर टीका होते. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांची परंपरा असलेला असल्याने याठिकाणी अशा टीकांचा काही उपयोग होणार नाही.महाराष्ट्रात सध्या जाती-पातीचे तसेच धार्मिक राजकारण सुरु आहे. अशाप्रकारचे राजकारण करणाऱ्यांना जनता कधीच थारा देणार नाही. राज्यात लोकांना भरकटवण्याचे काम केले जातेय. तरीही जनता अशा लोकांना ओळखते. त्यांना शांतताच हवी आहे. ही आजवरची राज्याची परंपरा असल्याने अशा लोकांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत.
महाराष्ट्रातील जनता अशा लोकांना कधीही थारा देत नाही, रोहित पाटलांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 2:34 PM