विटा : मी आजारी असताना पोटनिवडणूक लागणार, असा प्रचार अनेकांनी केला. परंतु, मी पारे येथील २६ डिसेंबरच्या सभेत २०३४ पर्यंत कोणालाही फाटी शिवून देणार नाही, असे सांगितले होते. पण, त्याला वर्ष होऊन गेले आहे. त्यावेळीच त्यांनी मला आपले बारामतीत काय ठरले आहे, हे सांगायला पाहिजे होते. परंतु, सत्ता आली की डोळे फिरतात, तरीही खानापूर मतदारसंघातील पुढचा आमदार मी किंवा गोपीचंद पडळकर ठरविणार नाही तर तो आमदार जनताच ठरवेल, असा टोला बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार अनिल बाबर यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना लगावला.आ. गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी खानापूर तालुक्यातील मोही येथील एका कार्यक्रमात सन २०२४ ची निवडणूक आमदार बाबर लढविणार नाहीत. तसे आमचे बारामतीमध्ये गेल्या निवडणुकीत ठरले होते. त्यामुळे पुढील आमदार हा भाजपचाच असेल, असा गौप्यस्फोट केला होता. त्या पार्श्वभूमीवर आमदार बाबर यांनी सुलतानगादे येथील एका कार्यक्रमात वक्तव्य केले.आमदार बाबर म्हणाले, पुढील सन २०२४ च्या निवडणुकीत खानापूर मतदारसंघात कोणी उभे राहायचे व कोणी निवडून यायचे हे जनताच ठरवेल. मी आजारी असतानाच आता पोटनिवडणूक लागणार, असा प्रचार करण्यात आला. परंतु, पारे येथे दि. २६ डिसेंबरच्या सभेत मी सन २०३४ पर्यंत कोणालाही फाटीसुद्धा शिवून देणार नाही, असे सांगितले होते. या सभेला वर्ष होऊन गेले आहे. बारामतीत गेल्या वेळी तसे मी कबूल केले असते तर दुसऱ्या दिवशी लगेच पडळकर यांनी मला आपले असे ठरलेय आणि आता असे का बोलताय? असे विचारले असते. सत्ता आली की लगेच डोळे फिरतात. पण, कोणी उभे राहायचे व कोणाला निवडून आणायचे हे अनिल बाबर किंवा गोपीचंद पडळकर ठरविणार नाहीत तर ते जनताच ठरवेल, असा टोला आमदार बाबर यांनी यावेळी लगावला.
नव्याने कलगीतुरादरम्यान, बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही पक्ष पुढील निवडणूक एकत्रित लढविणार असल्याचे वरिष्ठ पातळीवर सांगितले जात असतानाच खानापूर मतदारसंघात या दोन्ही गटांतील विद्यमान आमदारांत कलगीतुरा सुरू झाल्याचे दिसून येत आहे.