संदीप मानेखानापूर : उंच टेकड्या, दाट झाडी, खोल दरी, पावसाळ्यात तयार होणारे असंख्य धबधबे, निरव शांतता व सतत वाहणारा पाण्याचा झरा अशा निसर्गसंपन्न वातावरणात वसलेले खानापूर घाटमाथ्यावरील बेनापूरजवळील रामघाट हे ठिकाण प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन ठिकाण म्हणून ओळखले जाते.वनवास काळात राम, माता सीता व लक्ष्मण या घाटातून अगस्ती ऋषींच्या दर्शनाला गेले होते, म्हणून घाटाला ‘रामघाट’ असे नाव पडल्याचे जाणकार सांगतात. रामघाट हे गुहागर - विजापूर महामार्गालगत बेनापूर गावापासून तीन किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. डोंगर आणि दऱ्यांनी वेढलेल्या या घाटात प्रभू श्रीरामाचे मंदिर आहे.
मंदिरात श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या सुंदर मूर्ती आहेत. मंदिरासमोरच हनुमानाची दगडाची पुरातन मूर्ती आहे. परिसरातील महादेव मंदिरात श्रीराम महादेवाची पूजा करत अशी आख्यायिका आहे. याच परिसरात भवानी देवीचे मंदिर असून, छोट्या वीरगळ आहेत.
बेनापूरपासून रामघाटकडे जाणारे रस्त्याच्या विकासासाठी आमदार अनिल बाबर यांनी निधी मंजूर केला आहे. रस्ता रामघाटातून नेलकरंजीला जोडण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात आटपाडी तालुक्यातून खानापूरकडे येण्यासाठी पर्यायी मार्ग बनणार असून, रामघाटच्या विकासाला चालना मिळणार आहे. - सुहास शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य