आटपाडी : विटा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी खोटी तक्रार दाखल करून घेत, फिर्यादीशी संगनमत करून तब्बल १,५४५ ग्राम सोन्यावर डल्ला मारल्याची तक्रार या प्रकरणातील संशयित सागर जगदाळे (रा.करगणी ता.आटपाडी) याने पोलिस प्रमुख डॉ.बसवराज तेली यांच्याकडे केली आहे. या प्रकाराने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.निवेदनात म्हटले आहे की, १६ फेब्रुवारी रोजी विटा पोलिस ठाण्यामध्ये सूरज मकबुल मुल्ला याने खाेटी तक्रार दिली हाेती. त्याने आपल्या दुकानात कामास असणाऱ्या सागर लहू मंडले यास कोलकाता येथे घेऊन जाण्यासाठी विटा येथे १०० ग्रॅम सोने दिले होते, तसेच शंकर जाधव यांचेही ४५५ ग्राम सोने त्याच्याकडे हाेते. मात्र, ताे कोलकात्यास पाेहाेचलाच नाही. यामुळे त्याने या साेन्याची चाेरी केल्याचे म्हटले हाेते.
तपासाच्या दरम्यान विटा पोलिसांनी सागर मंडले याचा मित्र सागर जगदाळे याला ताब्यात घेत, सागर मंडले सोने घेऊन फरार असल्याचे सांगितले. यावेळी सागर जगदाळे याने सागर मंडले याने आपल्याकडे दाेन किलो सोने दिल्याचे सांगितले. यापैकी ४५५ ग्रॅम साेने विकले असून, राहिलेले १,५४५ ग्राम सोने आपल्या बहिणीकडे ठेवल्याची कबुली दिली. यानंतर, पाेलिसांनी हे साेने ताब्यात घेतले. सागर जगदाळे यास चार दिवस पोलिस ठाण्यात ठेवून अत्याचार केला.या प्रकरणातील मूळ फिर्यादीमध्ये केवळ १०० ग्रॅम सोने चोरीची तक्रार हाेती. तपासात दाेन किलाे साेने हस्तगत केले असताना, पाेलिसांनी केवळ ४५५ ग्रॅम सोने रेकॉर्डवर घेतले. उर्वरित १,५४५ ग्रॅम साेने पाेलिसांनी हडप केल्याचा आराेप सागर जगदाळे याने केला आहे.
याबाबतचे पुरावेही त्याने पोलिस अधीक्षकांकडे सादर केले असून, विटा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांची यांची चौकशी व्हावी, त्यांच्यापासून आपल्या जीवास धोका असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
पाेलिसांनी धमकावलेसागर जगदाळे याला २० फेब्रुवारी रोजी विटा पोलिस ठाण्याचे अधिकारी कन्हेरे, सचिन खाडे, शशी माळी यांनी वाळेखिंडी (ता.जत) येथे नेले. तेथील एका बागेत सागरच्या हातामध्ये १०० ग्रॅम सोनेची लगड देत, काही फोटो व व्हिडीओ तयार केले. तेथून विट्याकडे परतत असताना त्याला धमकावले. ‘तू किती सोने होते, ते कोणाला दिलेस? असे काही सांगितलेस, तर तुला गुन्हात अडकवेन,’ अशी धमकी दिली. या भीतीमुळे आपण कोणाकडे काही वाच्यता केली नाही, असेही सागर जगदाळे याने निवेदनात म्हटले आहे.