सांगली : येथील कंत्राटदार माणिकराव पाटील यांच्या खून प्रकरणाचा घटनेच्या दहाव्या दिवशीही छडा लागला नाही. पोलिसांनी सायबरच्या मदतीने काॅल्सची माहिती घेत तपास केला होता. यासह आतापर्यंत शंभरहून अधिकजणांकडे चौकशी केली असली तरी ठोस असे काहीही पोलिसांच्या हाती लागले नाही.मूळचे गोटखिंडी (ता. वाळवा) येथील कंत्राटदार माणिकराव पाटील सध्या सांगलीतील राममंदिर परिसरात राहण्यास होते. शनिवार दि. १३ रोजी रात्री त्यांचे अपहरण करण्यात आल्यानंतर कवठेपिरानजवळ वारणा नदीत त्यांचा मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यावरून त्यांचा खून झाल्याची शक्यता वर्तवत पोलिसांनी तपास सुरूच ठेवला आहे.सांगली ग्रामीण पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व इतरही पथक या खून प्रकरणाच्या तपासात आहेत. अत्यंत नियोजनबद्धरीत्या या खुनाचा कट रचल्याने तपास करताना पोलिसांसमोरही आव्हान निर्माण झाले आहे. सुरुवातीला त्या दोन दिवसांत पाटील यांच्याशी संपर्क झालेल्या व्यक्तींची पोलिसांनी चौकशी सुरू ठेवली. यातून काहीतरी धागेदोरे मिळतील, अशी शक्यता असताना काहीच हाती लागले नाही.त्यानंतर पोलिसांनी कॉल्स डिटेल्स, मोबाईल टॉवरची माहिती घेत तपास सुरू ठेवला असला तरी अद्यापही काहीच तपास पुढे सरकला नाही, पण लवकरच या प्रकरणाचा छडा लावू, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सांगलीतील कंत्राटदाराच्या खून प्रकरणाचा तपास ‘जैसे थे!’; शंभरहून अधिकजणांकडे चौकशी, ठोस पुरावाच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 1:54 PM