इस्लामपूर : इस्लामपूरपोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारातच दोन गटांत मारामारी सुरू असताना, भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना बुधवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे पाेलिस ठाण्याच्या आवारात खळबळ उडाली हाेती.याबाबत पोलिस कर्मचारी कपिल राजाराम खाडे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. २० ते २५ जणांच्या अनोळखी जमावाने केलेल्या धक्काबुक्कीत खाडे यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन माने जखमी झाले आहेत. याप्रकरणी अनोळखी २० ते २५ जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करणे यासह गर्दी व मारामारीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर दुपारच्या सुमारास दोन गटांत मारामारी सुरू होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. तात्काळ तेथे असलेल्या माने व खाडे यांनी बाहेर धाव घेतली. दोन्ही गटांना शांततेचे आवाहन करत असताना, जमावातील अनोळखी हल्लेखोरांनी त्यांचे न ऐकता अरेरावी सुरू केली. माने यांना पकडून त्यांच्या गळ्याला धरून धक्काबुक्की केली. याचवेळी कर्मचारी कपिल खाडे यांनाही धक्काबुक्की करण्यात आली.पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही असतानाही पोलिसांनाच संशयितांची ओळख तातडीने न पटवता आल्याने २० ते २५ जणांच्या अनोळखी जमावाविरुद्ध हा गुन्हा नोंद करावा लागला. दिवसाढवळ्या पोलिस ठाण्यासमोरच घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांचा कोणताही वचक राहिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच पोलिस ठाण्यातील पोलिसच असुरक्षित असल्याचे या घटनेने अधोरेखित झाले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद काटे अधिक तपास करीत आहेत.
भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की, सांगलीतील इस्लामपूर पोलिस ठाण्यासमोरच घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 5:40 PM