विटा : गेल्या ३० वर्षांपासून पद्धतशीरपणे जातीधर्माच्या नावाखाली विभागले जात होते. पण, आता ती प्रक्रिया आणखी पुढे गेली आहे. त्याची दाहकता वाढली असून, माणसांची मने विभागली जात आहेत. पण, सध्या देशात द्वेषाचे राजकारण सुरू झाले असून, ते लोकशाहीसाठी घातक आहे, असे परखड मत महात्मा गांधी यांचे पणतू व जेष्ठ गांधीवादी विचारवंत तुषार गांधी यांनी व्यक्त केले.
विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार यावर्षी तुषार गांधी यांना ज्येष्ठ विचारवंत ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आला. यावेळी ॲड. सुभाष पाटील, सुभाष पवार, प्रा. बाबूराव गुरव उपस्थित होते.तुषार गांधी म्हणाले, आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी काही मंडळी बांगलादेशात हिंदूंवर मुस्लीम लोक अत्याचार करत आहेत, असा खोटा प्रचार करत आहेत, असाच काहीसा प्रकार विशाळगड आणि धारावी याठिकाणीही घडत असल्याचे सांगितले गेले.
बांगलादेशात क्रांती झाली. सत्तापालट झाला आहे. अराजकता माजली आहे, परंतु आपल्या देशामध्ये तेथील मुस्लीम हिंदूंना मारत आहेत, असा खोटा व जाणीवपूर्वक प्रचार केला जात आहे. यावेळी संपतराव पवार, प्रा. विलास पाटील, ॲड. नानासाहेब पाटील, इंद्रजीत पाटील उपस्थित होते.
नेमका कितीचा झोला घेऊन चालला? राजकारणाचे संदर्भ बदलले आहे. चारचाकी गाड्यांभोवती सुरक्षाकडे, महागडे गॉगल व कपडे वापरतात आणि म्हणतात ‘झोला लेके आये थे, झोला लेके जायेंगे’, पण कितीचा झोला आणला होता, कितीचा झोला घेऊन चालला आहे, हे एकदा कळू द्या, असा टोलाही तुषार गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.
‘भारत जाेडाे’ अभियानज्येष्ठ विचारवंत ज्ञानेश महाराव यांनी महात्मा गांधीजींनी भारत जोडो अभियान राबविले होते. त्यानंतर त्यांचे पणतू तुषार गांधी यांनीदेखील अशा प्रकारे काही वर्षांपूर्वी अभियान राबविले. देशात सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले होते. पण, आज राहुल गांधीदेखील त्याच प्रेरणेने भारत जोडो अभियान राबवत असल्याचे सांगितले.