सांगली : सांगली लोकसभेच्या जागेबाबतचा प्रस्ताव उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे गुरुवारी पाठविला. या प्रस्तावावर खरगे आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या चर्चा होऊन काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीकडे निर्णय देणार आहेत. त्यानंतरच सांगली लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उतरणार की नाही, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या नेत्यांमध्ये संघर्ष टाेकाला गेला आहे. उद्धवसेनेकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असून, खासदार संजय राऊत शुक्रवारपासून दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यापूर्वी उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी सांगली लोकसभेच्या मतदारसंघाबाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांच्याकडे पाठविला आहे. या प्रस्तावामध्ये उद्धवसेनेकडून सांगली लोकसभेवर दावा कायम ठेवल्याचे बोलले जात आहे. तसेच सांगली लोकसभेच्या बदल्यात राज्यातील अन्य लोकसभा मतदारसंघ सोडण्याबाबतचा प्रस्ताव आहे, अशी खात्रीशीर सूत्राकडून सांगण्यात आले.
दिल्लीतून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे येणाऱ्या निर्णयावरच सांगली जागेचे भवितव्य ठरणार आहे. सांगलीत काँग्रेसने निवडणूक लढवायची की महाविकास आघाडीचा प्रचार करायचा, याचाही निर्णय लवकरच होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांचे सर्व लक्ष दिल्लीकडे लागले आहे.
काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते राजीनाम्याच्या तयारीतनुकत्याच मुंबईत पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीवर पक्षाचे कार्याध्यक्ष व माजीमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागेचा तिढा सुटत नसल्याने बहिष्कार टाकला होता. आता जिल्ह्यातील कॉंग्रेस नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत. दोन दिवसांत सांगलीमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देखील देण्याची शक्यता आहे.
विशाल पाटील समर्थकांकडून गाठीभेटी सुरूसांगली लोकसभेचे इच्छुक व काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या उमेदवारीचा प्रश्न सुटत नाही. तरीही विशाल पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी गुरुवारपासून मतदारसंघातील काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती काँग्रेसच्या नेत्यांनी दिली.