इस्लामपूर (सांगली): गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या महामारीचा परिणाम गणेशोत्सावर झाला होता. यावर्षी मात्र कोरोनाचे संकट दुरावले आहे. त्यामुळे इस्लामपुरात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत आहे. या उत्सवात पालेभाज्यांपेक्षा दुर्वांचाच भाव वधारला आहे, तर बाजारात कृत्रिम फुलामाळांची रेलचेल असली तरी नैसर्गिक पानाफुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी शहरात मंडळे आणि घरगुती गणपतीचे आगमन मोठ्या जल्लोषात झाले आहे. शहरातील विविध उपनगरात मंडळांची संख्या वाढल्याने मूर्ती आणि सजावट करण्यात मंडळाने भर दिला आहे. मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौकात कृत्रिम फुले, पाने आणि थर्माकोलचे तयार केलेले मकरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
पूजेसाठी नैसर्गिक पानेफुलाला भक्तांकडून महत्त्व दिले जाते. सध्या कृत्रिम फुलांचे दर अल्प आहेत, तर नैसर्गिक फुलांचे मात्र दर वाढलेले आहेत. गेल्या दोन वर्षांत कोरोनाचे सावट होते. त्यामुळे यावर्षी गणेश मूर्तींची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांचे दर दुप्पट झाले आहेत. तरीसुद्धा गणपतीची प्रतिष्ठापना करण्यासाठी भाविकांत उत्साहासह जल्लोष आहे.
झेंडू २०० रुपयांवर
झेंडू २०० रुपये किलो, शेवंती २०० रुपये, गुलाब १० ते १५ रुपये एक, जरबेरा रुपये १० ते १५ आणि मोगरा रुपये १००० किलो. तरीही भाविकांचे कृत्रिम फुलांचा फक्त सजावटी उपयोग केला जातो, तर नैसर्गिक फुले पूजेसाठी वापरली जातात. त्यामुळे दुर्वांची २१ काड्यांची पेंडी पाच पासून ते १० रुपयांपर्यंत गेली आहे.
कृत्रिम फुल, पाने यांच्यामुळे नैसर्गिक फुलांच्या विक्रीवर कोणतेही परिणाम झालेला नाही. झेंडू आणि जास्वंदी, शेवंतीच्या फुलांची गणेश भक्तांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे, तर शेतामध्ये शेतकऱ्यांकडून तणनाशक औषध फवारणी केल्यामुळे दुर्वांची मोठी टंचाई आहे. - गोरख माळी, फुल विक्रेता, इस्लामपूर