सांगली : म्हैसाळ उपसा योजनेतून शुक्रवारपासून (दि. २०) पाणी सोडण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. जलसंपदा विभागाने त्यासाठी तातडीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत दिल्या.जानेवारी उजाडताच जिल्हाभरात टंचाईचे ढग दाटू लागले आहेत. विशेषत: पूर्व भागातील मिरज, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी आदी तालुक्यांतील पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करत होते. त्याची दखल खाडे यांनी घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जलसंपदाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शुक्रवारी पंप सुरु करण्याच्या सूचना केल्या. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रासनकर आदी उपस्थित होते.अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी प्राप्त झाली आहे. त्यामुळे पंप सुरु केले जातील. थकबाकी व चालू पाणीपट्टी भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्याने पाणी दिले जाईल. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज व पाणीपट्टी तातडीने भरावी.
थकबाकी ९८ कोटींवरम्हैसाळ योजनेची गेल्या आवर्तनासह एकूण थकीत पाणीपट्टी ९७ कोटी ७४ लाखांवर पोहोचली आहे. शासन निर्णयानुसार पाणीपट्टीपैकी ८१ टक्के हिस्सा शासन भरते, तर फक्त १९ टक्के पैसे शेतकऱ्याने भरायचे आहेत. तरीही पैसे भरण्यासाठी शेतकरी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. यंदाच्या आवर्तनासाठी जलसंपदा विभागाने २३ हजार ४९४ रुपये प्रतिदशलक्ष घनफूट इतकी पाणीपट्टी निश्चित केली आहे.
कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारादरम्यान, योजनेचे आवर्तन सुरु न केल्यास सोमवारी (दि. २३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्यांसह लाक्षणिक उपोषणाचा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल आमटवणे, खंडेराव जगताप, सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील आदींनी दिला आहे. यावेळी महादेव गुंडेवाडी, विष्णू पाटील, गणेश देसाई, अविनाश पाटील, अर्जुन कदम आदी शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना त्यांनी निवेदन दिले.