सांगली : ‘आझादी का अमृतमहोत्सवी’ वर्षानिमित्त केंद्र शासनातर्फे दिल्ली येथे घेण्यात आलेल्या रांगोळी मेकिंग स्पर्धेत इस्लामपूर येथील सचिन अवसरे यांनी देशात दुसरा, तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. पाच लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.या स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत देशातील साडेपाच लाखपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. सचिन अवसरे यांनी 'जालियनवाला बाग हत्याकांड' या रांगोळीच्या माध्यमातून स्वातंत्र्यसंग्रामातील एक अविस्मरणीय प्रसंग रांगोळीत रेखाटून स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहिली. स्पर्धेत सचिन अवसरे यांनी देशपातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत दुसरा क्रमांक मिळवला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण दिल्ली येथील नेहरू पार्कमध्ये सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, विदेश राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, खासदार रवी किशन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यांनी सांगली जिल्हास्तरावर प्रथम आणि राज्यस्तरावरही प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्यामुळे अवसरे यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व देशपातळीवरील स्पर्धेत केले होते. या स्पर्धेतही त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावून सांगली जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचविले आहे.नरेंद्र मोदी यांनीही केला गौरवसचिन अवसरे यांनी 'जालियनवाला बाग हत्याकांड' हा स्वातंत्र्यसंग्रामातील अविस्मरणीय प्रसंग रांगोळीच्या माध्यमातून रेखाटून स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहिली होती. या वैशिष्ट्यपूर्ण रांगोळीची दखल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रविवार दि. २६ फेब्रुवारी रोजीच्या 'मन की बात' या कार्यक्रमात घेऊन सचिन अवसरेंचे भरभरून कौतुक केले आहे.
सांगलीच्या सचिन अवसरेंच्या रांगोळीला देशात दुसरा क्रमांक, पाच लाखांचे मिळाले बक्षीस
By अशोक डोंबाळे | Published: February 27, 2023 4:34 PM