मिरज : शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे महाबंड शिवसेनेला मोठा झटका आहे. त्यामुळे सद्यस्थितीत राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे. भाजपने सत्तास्थापनेचा दावा करावा अशी सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत केली. खरी शिवसेनाएकनाथ शिंदे यांचीच असल्याचा दावाही त्यांनी केला.
आठवले म्हणाले, काॅंग्रेस-राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युतीमुळे गेल्या अडीच वर्षांत सेनेच्या आमदारांमध्ये खदखद होती. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३६ आमदारांनी बंड केले. महाविकास आघाडीला आता तोंड काळे करण्याची वेळ आली आहे. राज्यात सत्तेत असतानाही सेनेच्या आमदारांची कामे होत नव्हती, त्यांना विश्वासात घेतले जात नव्हते. केवळ भाजपवर आरोप करून सत्ता राखण्याची महाविकास आघाडीची धडपड सुरू होती. म्हणूनच राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता एकनाथ शिंदे यांनी सरकारलाच सुरुंग लावला आहे.
संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करून त्यांना युती तोडण्यास भाग पाडले. भाजपने मुख्यमंत्रिपदाचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते, हे सत्य आहे. यामुळे आता निर्माण झालेल्या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून जावे लागेल. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जास्त आमदार असल्याने त्यांचीच खरी शिवसेना आहे. मी स्वतः देवेंद्र फडणवीस याना भेटून एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याची विनंती करणार आहे. भाजप व मित्रपक्षांचे सरकार स्थापन झाल्यास रिपाइंला मंत्रिपद, महामंडळ, कमिट्या देण्याची मागणी करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका आदिवासी महिलेस राष्ट्रपती निवडणुकीसाठी संधी देऊन अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो. मुर्मू या निवडणुकीत विजयी होणार, हे नक्की आहे. विरोधकांनी शरद पवार याना राष्ट्रपती निवडणुकीत उतरवून त्यांचा बळीचा बकरा करण्याचे ठरविले होते. मात्र जेथे विजयाची शक्यता नाही, तेथे पवार ते जाणार नाहीत. मुंबई महापालिकेतही यावेळी भाजप व मित्रपक्षांची सत्ता येणार असल्याचा दावाही आठवले यांनी केला. यावेळी रिपाइंचे नेते, नगरसेवक विवेक कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सद्याच्या राजकीय स्थितीवर आठवले यांनी कविता सादर केली.
राऊत, ठाकरे कंपनीचे नको ते सर्व धंदे...बंद करणारे एकनाथ शिंदेशिंदे व सहकारी सच्चे व खंदे,ते अजिबात राहिले नाहीत अंधे,म्हणून येताहेत शिंदे...