भिलवडी : देशाचा आर्थिक विकास दर उंचाविण्यासाठी शेती व दुग्ध व्यवसायामध्ये क्रांतीकारक बदल होणे आवश्यक आहे. सरकारवर अवलंबून न राहता आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर, कमीत कमी उत्पादन खर्च, जास्तीत जास्त उत्पादन व भविष्याचा वेध घेण्याची क्षमता ओळखून चितळे डेअरीने केलेली क्रांती देशातील कृषी व दुग्ध क्षेत्राला दिशा देणारी असल्याचे प्रतिपादन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.भिलवडी स्टेशन ता.पलूस येथे भारतातील अद्ययावत चितळे डेअरी आणि जगातील सर्वात मोठ्या जेनेटिक संस्थेच्या (ए. बी. एस. जीनस) यांच्या संयुक्त विद्यमाने,अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उभारण्यात आलेल्या सेक्सेल सिमेन जेनेटिक लॅबच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी कृषी मंत्री शरद पवार होते.गडकरी म्हणाले की, सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडी वर अवलंबून राहून कोणताही धंदा व व्यापार करायचा ठरविल्यास गाडी कधी पंक्चर होईल हे सांगता येणार नाही.महिला सक्षमीकरणा मुळे संगलीसह पश्चिम महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्या पेक्षा मोठे उत्पादन होत आहे.शेतीला दर्जेदार बियाणे व कलमे तशी दूध वाढीसाठी देशभर दर्जेदार सिमेन उपलब्ध करून द्यावे लागेल.कमी खर्चात जादा प्रोटीन देणाऱ्या गवताची निर्मिती करावी लागेल.दुधाचे उत्पादन वाढले तरी ही उत्पादन खर्च कमी कसा होईल या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील.चितळे डेअरीने काळाची पावले ओळखून २१ व्या शतकात देशातील दुग्ध व्यवसाय समृध्द करण्याचे पाऊल टाकले आहे.या उपक्रमासाठी भविष्यात भारत सरकारकडून चितळे डेअरीस लागेल ती मदत दिली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.शरद पवार म्हणाले की,भारतावर ब्रिटिशांचे राज्य असताना गव्हर्नर समोर शेतकऱ्यांच्या वेशात जाऊन महात्मा जोतिबा फुले यांनी शेतऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी काही धोरणात्मक व क्रांतीकारी अशा मागण्या केल्या होत्या.त्या वास्तवात सत्यात आणण्याचे काम चितळे परिवाराने पूर्ण केले आहे. आधुनिकता, दूरदृष्टी, प्रयोगशिलता,कमी उत्पादन खर्चात जादा उत्पादन घेण्याची नवी दृष्टी भारतीय कृषी क्षेत्रात निर्माण झाली.जी.एम.बियाणांचा वापर केल्यास देश अन्नधान्य उत्पादनात समृध्द बनेल.जी.एम.व्हरायटी न वापरण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे.या निर्णयाच्या विरोधात केंद्र सरकारने कोर्टात जावे. ऊसाचे उत्पादन मोठे होत आहे.त्यापासून साखर निर्माण करण्याबरोबर इतर उप पदार्थ निर्माण केल्यास शेतकऱ्यांना चांगला दर देणे शक्य होईल.यावेळी नानासाहेब चितळे, विश्वास चितळे, श्रीपाद चितळे, अनंत चितळे, गिरीश चितळे, मकरंद चितळे, जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, खा. संजयकाका पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, डॉ. विश्वजीत कदम, सुधीर गाडगीळ, मोहनराव कदम, सुमनताई पाटील, अनिल बाबर, मानसिंगराव नाईक, विक्रम सावंत, अरुण लाड, पृथ्वीराज देशमुख, सदाशिव पाटील, अमरसिंह देशमुख, दिनकर पाटील, जिल्हाधिकारी राजा दयानिधी आदी उपस्थित होते. विश्वास चितळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, दिनेश रावत यांनी आभार मानले.
चितळे डेअरीने केलेली क्रांती देशातील कृषी व दुग्ध क्षेत्राला दिशा देणारी - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 5:01 PM