संतोष भिसे
अस्तंगत होत चाललेली जात म्हणून शासनाने घोषित केलेल्या होलार समाजाचा जगण्याचा संघर्ष अजूनही कायम आहे. परंपरेशी चिकटूनच राहण्याच्या सवयीमुळे बदल वेगाने झाले नाहीत; पण नवी पिढी आता नव्या सूर्योदयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. शिक्षणाशिवाय उद्धार नाही, हे लक्षात आल्याने पुस्तकांशी गट्टी करू लागली आहे. जुन्या पिढीसाठी नवतरुणाई आशेचा किरण बनून राहिली आहे.
जिल्ह्यात होलार समाजाची लोकसंख्या अवघ्या २५ ते ३५ हजारांच्या घरात आहे. काही ठिकाणी मोची, काही ठिकाणी चांभार तर काही ठिकाणी होलार या नावाने त्यांना ओळखले जाते. मंदिरांसमोर आणि धार्मिक कार्यक्रमात वाजंत्री म्हणून काम करणे, हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर या पूर्वेककडील तालुक्यांत अजूनही मोठ्या संख्येने समाज याच कामात आहे. मंदिरांसमोर वाजविण्याच्या परंपरेबद्दल अनेकांना कधीकाळी शेतजमिनी इनाम स्वरूपात मिळाल्या आहेत; पण त्यातून समृद्ध शेती पिकविण्याची कला जुन्या पिढीला जमली नाही. परिणामी, आजही ते पारंपरिक व्यवसायातच आहेत.
धुपारतीला होलार हवेतच!कोकळे येथील ओढ्यातील देवीचे मंदिर, खरसुंडीचा सिद्धनाथ, जत, सांगोला येथील देवस्थाने येथे उदरनिर्वाहासाठी ते स्थायिक झाले आहेत. लग्नसोहळे, देवांसमोरील धुपारत्या यामध्ये मान मिळतो. टाळकुटे, जाधव, कुलकर्णी, देसाई ही काही त्यातील प्रमुख आडनावे. पोटासाठी सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत गेलेली अनेक कुटुंबे तेथेच स्थायिक झाली आहेत.
कर्जच नाही, तर कर्जमाफी कुठली?वंचितातील वंचित या प्रवर्गात हा समाज ओढला गेला आहे. पत नसल्याने बँका कर्ज देत नव्हत्या, त्यामुळे कर्जमाफीचा प्रश्नच येत नव्हता. या शोचनीय अवस्थेवर नवी पिढी हिकमतीने मार्ग काढत आहे. पूर्वजांनी अनुभवलेली परिस्थिती नव्यांसमोर येऊ नये, यासाठी संघर्ष करीत आहे. मधल्या पिढीने वडाप, बँजो, बँड यामध्ये बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला. सध्याची पिढी मात्र शिक्षण आणि नोकऱ्यांच्या मार्गावर आहे. उन्नती करत आहे. हक्क आणि अधिकारांसाठी शासनासोबत दोन हात करीत आहे. त्यामुळे भविष्यात हा समाज उजळ माथ्याने पुढे येण्याची आशा आहे.