सांगली: महापालिकेत विकासकामांच्या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळण्यासाठी लेखा विभागाच्या अधिकाऱ्याने फाईलीवर कोंबड्याचा शेरा पाहिजे, अशी अट नगरसेवकाला घातली होती. नगरसेवकाने थेट जिवंत कोंबडा आणि कामाची फाईल घेऊन लेखा विभाग गाठले. पण अधिकारी गैरहजर असल्याने नगरसेवकाने मुख्यालयाच्या दारात ठिय्या मारत आंदोलन केले.
राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू होती. थोरात यांनी पालिका अर्थसंकल्पातील स्थानिक विकास निधीतून ३० लाखाच्या कामाचे प्रस्ताव तयार केले. गेल्या दोन दिवसापासून ते फाईली घेऊन मंजुरीसाठी फिरत आहेत. लेखा विभागातील अधिकाऱ्यांनी त्याला केवळ दहा लाखाचेच काम मंजूर केले जाईल, असे सांगितले. थोरात यांनी दहा लाखाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करून ते मंजुरीसाठी लेखाधिकाऱ्यांना दिले. पण त्यांनी फायलीवर आयुक्तांचा कोंबडा नसल्याचे कारण देत फाईल मंजूर केली नाही. थोरात यांनी लेखाधिकाऱ्यांना जाबही विचारला.
मंगळवारी सकाळी थोरात हे कोंबडा घेऊन महापालिकेत आले. त्यांनी थेट लेखाविभाग गाठला, पण वरिष्ठ अधिकारी गैरहजर होते. मुख्यालयाच्या दारात ठिय्या मारत थोरात यांनी फायलीवर कोंबडा ठेवत आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाची चांगलीच चर्चा महापालिकेत झाली. यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेसचे नगरसेवक तौफिक शिकलगार होते. पालिकेतील अधिकाऱ्यांनी थोरात यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.