विटा : घानवड (ता. खानापूर) येथील श्री रेणुका देवीच्या गळ्यातील २१ हजार रुपये किमतीचे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी देवीच्या पुजारी सीताबाई रामचंद्र सावंत (वय ५८, रा. घानवड) यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे.घानवड येथे श्री रेणुका देवीचे मंदिर आहे. या मंदिरात सीताबाई सावंत या देवीची पूजा करतात. देवीच्या मूर्तीच्या गळ्यात ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र आहे. सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने कळकाच्या काठीला तारेचा आकडा तयार करून दरवाजातून आकडा टाकत देवीच्या गळ्यातील २१ हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र लंपास करून पलायन केले.सोमवारी सकाळी पुजारी सीताबाई सावंत या पूजा करण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. त्यावेळी लोकांना तारेचा आकडा बसवलेली कळकाची काठी घटनास्थळी सापडली. याप्रकरणी सीताबाई सावंत यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sangli: रेणुका देवीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी केले लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 3:40 PM