मिरज : आरग (ता. मिरज) येथे ॲक्सिस बॅंकेचे एटीएम चोरट्यांनी चक्क जेसीबीने उचकटून काढले. काल,शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. एटीएम मशिन दणकट असल्याने सुदैवाने २५ लाखांहून अधिक रक्कम चोरट्यांना नेता आली नाही. या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. पोलीसांनी चोरट्यांच्या शोधासाठी तात्काळ मोहिम हाती घेतली आहे.
आरगमध्ये ग्रामसचिवालयानजिक ॲक्सिस बॅंकेचे एटीएम आहे. सुमारे आठ-दहा महिन्यांपूर्वीच ते सुरु झाले असून दिवसभर ग्राहकांची गर्दी असते. मध्यवस्तीतील हे एटीएम चोरट्यांनी लक्ष्य केले. शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता एटीएममध्ये जेसीबी घुसविला. एटीएम मशिन तळातून उचकटून काढले. जेसीबीमधूनच घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. सुमारे ५० मीटर गेल्यावर खड्ड्यात जेसीबी कलल्याने एटीएम मशिन खाली पडले. चोरट्यांना ते पुन्हा उचलता आले नाही. त्यामुळे मशिन व जेसीबी तेथेच टाकून त्यांनी पळ काढला.या दरम्यान, रात्रीच काही तरुणांनी हा प्रकार लक्षात आला. त्यांनी पोलीसांना कळविले. चोरीची घटना शनिवारी सकाळी गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर एटीएमभोवती एकच गर्दी झाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान, चोरटे सराईत आणि माहितगार असावेत असा अंदाज आहे. त्यांना जेसीबी चालविता येत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.गावात मोठ्या संख्येने जेसीबी यंत्रे आहेत. रात्री विविध पेट्रोल पंपांवर ती लाऊन ठेवली जातात. यापैकीच एक जेसीबी चोरट्यांनी चोरीसाठी वापरला. बनावट किल्लीद्वारे जेसीबी यंत्र सुरु करुन गावात आणले. एटीएम मशिनमध्ये शुक्रवारीच मोठी रक्कम भरण्यात आली होती. पण ते फोडता न आल्याने पैसे चोरट्यांच्या हाती लागले नाहीत. तथापि, तोडफोडीमुळे मोठे नुकसान झाले आहे. एटीएम कक्षातील सीसीटीव्हीतील चित्रणाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा पोलीसांचा प्रयत्न आहे.