मानाजी धुमाळरेठरे धरण : रात्रीची वेळ... बाहेर संततधार पाऊस, घरातील बाथरूममध्ये बिथरलेला बिबट्या, बाजूच्याच एका खोलीमध्ये घाबरलेली आजी व नात, अशा बिकट स्थितीमध्ये मरळनाथपूरच्या हजारे वस्तीवर शे-दीडशे जणांच्या जमावाचा कल्लोळ सुरू होता. मात्र, वनविभागाच्या पथकाने अंगात सेफ्टी जॅकेट, दरवाजाला जाळी, हातात बॅटऱ्या व लाठ्या घेऊन प्रसंगावधान राखत बिबट्याची सुरक्षित सुटका करत, त्यास डोंगराच्या बाजूने पिटाळले आणि हजारे कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास घेतला.मरळनाथपूरच्या हजारे वस्तीवर बाळासाहेब हजारे व बबन हजारे या दोन्ही भावांची घरे आहेत. मंगळवारी रात्री बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती. बाळासाहेब हजारे यांचे कुटुंबीय घरी जेवण करत, बोलण्यात मग्न होते. याच वेळी एका मांजरीचा पाठलाग करत बिबट्याने थेट त्यांच्या घरात प्रवेश केला. श्वास घेण्याचीही उसंत न घेता, सारे कुटुंब भयभीत होऊन बाहेर पळाले. प्रसंगावधान राखत बाळासाहेब यांनी बिबट्या शिरलेल्या खोलीस बाहेरून कडी लावली, परंतु या खोलीच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या खोलीत त्यांची वृद्ध आई व मुलगी अडकून पडली.दरम्यान, बिबट्याने आड्यावरून दुसऱ्या बाजूला असलेल्या बाथरूममध्ये उडी घेतली. तो तेथेच अडकून पडला. वनविभागाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. पथकाने बिबट्यास पकडण्यासाठी पिंजराही आणला होता, परंतु बिबट्याची पाहणी केली असता, बिबट्याचे वय कमी असल्याचे लक्षात आले. जवळपास बिबट्याची मादी असल्यास ती बिथरण्याची शक्यता गृहित धरून, त्यांनी बिबट्यास पकडून अन्यत्र नेण्याऐवजी सुरक्षितपणे त्याच परिसरात मुक्त करण्याचा निर्णय घेतला. सेफ्टी जॅकेट, दरवाजाला जाळी, हातात बॅटऱ्या व लाठ्यांच्या मदतीने बिबट्यास खोलीतून सुरक्षितपणे बाहेर काढत मरळनाथपूर डोंगराच्या दिशेने पिटाळून लावले.या बचाव मोहिमेत उपवन संरक्षक नीता कट्टे, सहायक वनसंरक्षक डॉ.अजित साजणे यांच्या मार्गदर्शनखाली वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक रायना पाटोळे, अक्षय शिंदे, वनसेवक शहाजी पाटील-खंडागळे, अनिल पाटील, प्राणिमित्र युनूस मनेर यांनी भाग घेतला.
आजी व नात भीतीने गर्भगळीत
बिबट्या असलेल्या बाजूला खोलीत आजी व नात अडकून पडली. आड्यावरून बिबट्या त्यांच्या खोलीत येण्याची शक्यता असल्याने दोघीही भीतीने गर्भगळीत झाल्या होत्या. दरम्यान, बाहेर मोठा जमाव एकत्र आला. त्यांनी बिबट्या त्यांच्या बाजूला येऊ नये, यासाठी खोलीत आग पेटविण्यास ओरडून सांगितले. यानंतर, दोघींही खोलीमध्ये जाळ करून घाबरून बसल्या होत्या.