- शीतल पाटील
सांगली - सांगलीतील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आजपासून पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून राज्यभरातून ४०० हून अधिक महिला मल्ल स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच सांगलीत महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहेत. या कुस्ती स्पर्धेवरून राज्यभर वाद रंगला होता. सांगलीतील स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर दोन आखाडा तयार करण्यात आले आहेत. मंडप, महिला मल्लांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था झाली आहे. प्रशिक्षक, पंचाची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संकुलाच्या मैदानावर मंडप घालण्यात आला आहे.
२३ मार्चला सकाळी महिला कुस्तीगीरांची वजने घेतली जातील. सायंकाळी व दुसऱ्या दिवशी स्पर्धा होतील. २४ मार्चला सायंकाळी सहा वाजता अंतिम कुस्ती होील. स्पर्धेसाठी राज्यभरातून ४५ संघांतून सुमारे ४०० ते ४५० स्पर्धक सहभागी होत आहे. महापालिकेच्या संघांचाही सहभाग आहे. राज्यभरातील संघांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. विजेत्यांना चांदीची गदा व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कुस्तीगीर परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास शिंदे, संपत जाधव, तसेच कृष्णा शेंडगे, प्रतापराव शिंदे, शिवाजी जाधव, हणमंतराव जाधव, सुनील मोहिते, रवींद्र गायकवाड आदी परिश्रम घेत आहेत.