सांगली : सांगली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तिन्ही इच्छुक उमेदवारांचा मुहूर्त पक्का झाला आहे. भाजपचे उमदेवार व खासदार संजय पाटील १८ एप्रिलला, तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील व अपक्ष विशाल पाटील १९ एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.सांगली लोकसभेसाठी शुक्रवार (दि. १२)पासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात होत आहे. तसेच १९ एप्रिल अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यानुसार प्रत्येकाने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपला मुहूर्त काढून ठेवले आहेत. भाजपचे उमेदवार संजय पाटील १८ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येणार असून जाहीर सभाही होणार आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील १९ एप्रिलला अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत व शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत, असे उद्धवसेनेकडून सांगण्यात आले.महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नसल्यामुळे नाराज असलेले काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील दि. १९ एप्रिलला काँग्रेस आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल करणार आहेत.
सांगलीत उमेदवारांचा अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला; कोण कधी अर्ज भरणार..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 5:38 PM