Loksabha Election: प्रतिस्पर्धी बदलण्याची परंपरा सांगली मतदारसंघात कायम, दीर्घकाळ लढणारा काँग्रेसही मैदानाबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 06:08 PM2024-04-03T18:08:23+5:302024-04-03T18:09:33+5:30
सांगली : लोकसभेच्या मैदानात प्रतिस्पर्धी बदलण्याची परंपरा सांगलीसाठी नवी नाही. १९५७ पासूनच्या निवडणुकीत सतत प्रतिस्पर्धी उमेदवार बदलत राहिले. बहुतांश ...
सांगली : लोकसभेच्या मैदानात प्रतिस्पर्धी बदलण्याची परंपरा सांगलीसाठी नवी नाही. १९५७ पासूनच्या निवडणुकीत सतत प्रतिस्पर्धी उमेदवार बदलत राहिले. बहुतांश पंचवार्षिक निवडणुका लढविणाऱ्या काँग्रेसलाही मैदानातून बाहेर व्हावे लागले आहे.
सांगली लोकसभेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा विजय मिळविणाऱ्या काँग्रेस पक्षाला २०१९च्या निवडणुकीत जागा मिळाली नाही. त्यापूर्वीच्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेस मैदानात होती. काँग्रेसविरोधातील प्रतिस्पर्धी सतत बदलत राहिले. २०१४ पासून भाजप विजयी सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर आता त्यांचे प्रतिस्पर्धी सतत बदलत आहेत.
सुरुवातीला काँग्रेसशी, नंतर स्वाभिमानी शेतकरी पक्षाशी सामना करून आता पुन्हा शिवसेनेशी त्यांचा सामना होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या विरोधात सर्वाधिक वेळा भाजप प्रतिस्पर्धी राहिला. त्यानंतर शेतकरी व कामगार पक्ष, जनता पक्ष, भारतीय लोक दल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अपक्ष अशा अनेकांनी जोरदार लढत दिली.
वर्ष - विजयी - पराभूत
१९५७ - शेकाप - काँग्रेस
१९६२ - काँग्रेस - रिपब्लिकन पक्ष
१९६७ - काँग्रेस - शेकाप
१९७१ - काँग्रेस - शेकाप
१९७७ - काँग्रेस - भारतीय लोक दल
१९८० - काँग्रेस - जनता पक्ष
१९८४ - काँग्रेस - जनता पक्ष
१९८९ - काँग्रेस - भाजप
१९९१ - काँग्रेस - कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
१९९६ - काँग्रेस - अपक्ष
१९९८ - काँग्रेस - भाजप
१९९९ - काँग्रेस - राष्ट्रवादी
२००४ - काँग्रेस - भाजप
२००९ - काँग्रेस - अपक्ष
२०१४ - भाजप - काँग्रेस
२०१९ - भाजप - स्वाभिमानी पक्ष