आटपाडी : आटपाडीतील बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणीची खरेदी बाबासाहेब देशमुख इंडस्ट्रीज प्रा.लि.या कंपनीने जिल्हा बँकेकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच घेतली आहे. बँकेचे कर्ज फेडून त्या कर्जाव्यतिरिक्त इतर देणी देण्याची हमी कंपनीने दिली आहे. त्यातील काही रक्कम अदा केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेने सूतगिरणी ताब्यात घेतली होती. कर्ज वसुली होत नसल्याने बँकेने वसुलीसाठी लिलाव प्रक्रिया राबवली. लिलावात सर्वाधिक रकमेची निविदा बाबासाहेब देशमुख इंडस्ट्रीज प्रा. लि. मार्फत आल्याने बँकेने ती निविदा मंजूर केली. बँकेचे थकीत असणारे कर्ज भरून घेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सूतगिरणी कंपनीच्या ताब्यात दिली आहे. त्यानंतर बँकेची रक्कम अदा करून उर्वरित इतर देणी देण्याची हमी कंपनीने स्वीकारून कायदेशीरपणे हा व्यवहार पूर्ण झाला आहे.ते म्हणाले, सूतगिरणी विक्रीची निविदा ५ ऑगस्ट २०२० रोजी उघडली. कंपनीची निविदा सर्वाधिक असल्याने बँकेच्या संचालक मंडळाने ठराव करून सूतगिरणी ताब्यात दिली आहे. त्यानुसार १२ कोटी कर्ज व व्याजाची रक्कम एकरकमी भरली. तर उर्वरित २८ कोटींची थकीत देणी टप्याटप्याने देण्याची हमी आम्ही बँकेला दिली आहे. जिल्हा बँकेला कर्जापोटी भरलेली रक्कम व इतर देणी यांच्या रकमेची बेरीज केल्यास सूतगिरणी ४० कोटीहून अधिक रकमेलाच पडली. त्यानुसारच हा व्यवहार झाला आहे.न्यायालयाच्या आदेशानंतरच लिलाव प्रक्रियाअमरसिंह देशमुख म्हणाले की, जिल्हा बँकेने सुरू केलेल्या लिलाव प्रक्रिये विरोधात बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी प्रशासन उच्च न्यायालयात गेले होते. मात्र उच्च न्यायालयाने बँकेच्या बाजूने निकाल देत लिलाव प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते.
आटपाडीतील सूतगिरणीचा व्यवहार कायदेशीरच, सांगली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 4:29 PM