सांगली : शहरातील काळी खण परिसरात ट्रकला अचानक आग लागल्याने द बर्निंग टेम्पोचा थरार घडला. महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडील जवानांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.शहरात गॅस पाईपलाईनचे काम सुरू आहे. या कामासाठी औद्योगिक वसाहतीतून पीव्हीसी पाईप भरून ट्रक सांगलीकडे येत होते. स्वरुप चित्रमंदिराकडून तो आपटा पोलिस चौकीकडे निघाला होता. महापालिकेच्या आरसीएच कार्यालयाजवळ ट्रकमधील पीव्हीसी पाईपचा विद्युत मंडळाच्या उच्च दाबाच्या तारेला स्पर्श झाला. वीजेचे ठिणगी पडताच ट्रकमधील पाईपने पेट घेतला.या ट्रकच्या मागे असलेल्या वाहनचालकांनी ट्रकचालकाला सावधान केले. वेळीच ट्रक चालकाने ट्रक रस्त्याकडे घेतला. तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते. नागरिकांनी तातडीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली.अवघ्या काही मिनिटात अग्निशमन अधिकारी विजय पवार हे सहा जवान व अग्निशमन गाडीसह घटनास्थळी दाखल झाले. चार ते पाच मिनिटांतच आगीमुळे ट्रकमधील पाईप जळून खाक झाल्या. अग्निशमन विभागाने तातडीने आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
सांगलीत बर्निंग ट्रकचा थरार, विद्युत तारेला स्पर्श झाल्याने लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 6:59 PM