आटपाडी : करगणी (ता. आटपाडी) येथील महाशिवरात्र यात्रेनिमित्त भरलेल्या खिलार जनावरांच्या बाजारात अंदाजे साडेतीन ते चार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. या यात्रेत तब्बल सहा हजारांहून अधिक जनावरांची आवक झाली होती.माणदेशी वसलेल्या भूभागात देशी जातिवंत खिलार गाई व खोंड, बैल याला मोठी मागणी आहे. यात वर्षभरापासून बैलगाडा शर्यत सुरू झाल्याने खिलार बैल व गायींना चांगले पैसे येऊ लागले आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी बैलगाडा शर्यत बंद होत्या. परिणामी खिलार देशी गायी व बैल यांची संख्या प्रचंड कमी झाली होती. देशी खिलार संवर्धन करण्यासाठी मोहीम उघडण्यात आली होती. दरम्यान, करगणी येथे भरणाऱ्या यात्रेत शेतकरी हा आपल्या बैलांची देवाणघेवाण करून नवीन जोड घेत असतो. शेतीच्या कामासाठी नव्या दमाचे बैल घेण्यासाठी मोठी उलाढाल होत असते.करगणी ते बाळेवाडी रस्ताच्या दुतर्फा पसरलेल्या विस्तृत माळरानावर यात्रा भरली होती. खिलार खोंड, वळू आणि बैलांना विक्रीसाठी दाखल केले होते. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलांच्या मिरवणुका काढल्या. सांगली, सातारा, सोलापूर, कर्नाटक या भागांतून शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने आले होते. यात्रेत सहा हजारांवर आवक, तर चार कोटींवर उलाढाल झाल्याचे बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव यांनी सांगितले. लहान खोंड, बैल आणि वळूची संख्या जास्त होती, तर शर्यतीच्या बैलाची संख्या मोजकीच होती. अत्यंत देखण्या खिलार खोडाच्या किमती पंधरा हजारांपासून एक लाखापर्यंत होत्या. शर्यतीच्या बैलांच्या किमती लाखापासून तीन ते पाच लाखांपर्यंत होत्या.संपूर्ण यात्रेचा परिसर बाजार समिती आणि ग्रामपंचायतीने यात्रेच्या पार्श्वभूमीवर खिलार झाडे काढून स्वच्छ मैदान केले होते. यात्रेत जागोजागी विजेची आणि पाण्याची ही सोय केली होती.
Sangli: खिलारची ४ कोटींची उलाढाल, करगणीत जनावरांच्या बाजारात उच्चांकी विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 17:40 IST