सांगली : बहुमत नसतानाही असंवैधानिक सरकार बनविण्यासाठी शिवसेनेतून फुटून ४० आमदारांनी मदत केल्याप्रकरणी त्यांचीच महायुती सरकारला जास्त चिंता आहे. म्हणून ते राज्यातील महिला व मुलींना संरक्षण देण्यात कमी पडत आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगलीत सोमवारी पत्रकार परिषदेत केला. शासनाने बदलापूर घटनेतील आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, बदलापूर येथील घटनेबाबत सरकारने तात्काळ काही उपाययोजना करण्याची गरज होती. पण, या सरकारकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. महिलांच्या हितासाठी हे सरकार आहे, असा ढोल सत्ताधारी वाजवत आहेत. पण राज्यातील महिला आणि मुलींच्यावर अन्याय होताना, ते थांबविण्यासाठी काहीच उपाययोजना झाल्या नाहीत. बदलापूर येथील ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेच्या प्रशासनात कोण आहे. त्यांना वाचवण्यासाठीच सत्ताधारी प्रयत्नशील होते. त्यामुळेच जनता त्यांच्यावर चिडून आहे. दिवसेंदिवस अशा घटना घडत आहेत. पण सरकार शासकीय कार्यक्रम करण्यात मश्गूल आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडतोय ती शरमेची गोष्ट
सिंधुदुर्ग येथे सहा महिन्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी पडला आहे. ही या सरकारसाठी शरमेची गोष्ट आहे. याला जबाबदार कोण?, सहा महिन्यांत हा पुतळा पडतोय, म्हणजे या पाठीमागे काय काळेबिरे आहे? याचा तपास झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रात पुतळा उभा करण्यात येणार म्हणून गेल्या दहा वर्षांपासून सांगण्यात येत आहे. पण अद्यापही हा पुतळा उभा करण्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. पण सहा महिन्यांपूर्वीच खुद्द मोदी यांनी उद्घाटन केलेला पुतळा पडतोय, याची खंतही सत्ताधाऱ्यांसह कोणालाही वाटत नाही, याचे दुःख वाटतेय, असे डॉ. विश्वजीत कदम म्हणाले.
जळगावमध्ये २४ लोक मृत्यू झाले असतानाही मोदींची सभाजळगावमधील २४ लोक काठमांडू येथे अपघातात ठार झाले. त्यानंतरही लगेच त्याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली आहे. ही सभा घेऊन त्यांनी आपण असंवेदनशील असल्याचे दाखवून दिले आहे. ही सभा आठ दिवसांनी घेतली असती तरीही चालले असते. पण त्यांनी तसे न करता तात्काळ ही सभा घेतली आहे. त्यामुळे मोदी यांना जनतेविषयी किती कळवळा आहे हेच स्पष्ट झाले आहे, अशी टीकाही डॉ. विश्वजीत कदम यांनी केली.