सांगली : कुपवाडमध्ये बेदाणा धुण्यासाठी चक्क वॉशिंग पावडरचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यावसायिकाकडील ५५० किलो पेंडखजूरला कीड लागल्याचेही दिसून आले.कुपवाड औद्योगिक वसाहतीत अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम राबवली असता, हे प्रकार उघडकीस आले. विनापरवाना बेदाणा वॉशिंग व रिपॅकिंग करणाऱ्या केंद्रांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आले आहेत. सहाय्यक आयुक्त नि. सु. मसारे यांनी ही माहिती दिली.जिल्ह्यात बेदाणा हंगामामुळे बरीच नवी बेदाणा वॉशिंग व रिपॅकिंग केंद्रे सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा पथकाने वसाहतीत ठिकठिकाणी तपासण्या केल्या. विजय संजय सावंत यांचे ओमी सेल्स कॉर्पोरेशन, रणजित शिवाजी मुळीक यांचे बाबा ड्रायफ्रुटस व अशोक चौगुले यांचे चौगुले ट्रेडिंग येथे पाहणी केली. त्यांनी विनापरवाना केंद्र सुरू केल्याचे आढळले. वॉशिंग सेंटरमध्ये अस्वच्छताही होती.बाबा ड्रायफ्रुटस व चौगुले ट्रेडिंग या पेढ्यांमध्ये रिपॅकिंगच्या लेबलवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत माहिती नोंदवली नसल्याचे आढळले. उत्पादनाचा व रपॅकिंगचा पत्ता, मुदतबाह्यतेचा दिनांक, बेदाण्यातील पोषक तत्वांची माहिती, बॅच क्रमांक, परवाना क्रमांक आदी माहिती लेबलवर नव्हती. त्यामुळे या केंद्रांना व्यवसाय त्वरित थांबविण्याची नोटीस देण्यात आली. सांगली ट्रेडींग व श्री दत्त कोल्ड स्टोअरेज या पेढ्यांचीही तपासणी झाली. सांगली ट्रेडिंग कंपनी विनापरवाना व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. विक्रीसाठीच्या पॅकिंगवर आवश्यक मजकूर नव्हता. त्यामुळे व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली.सहाय्यक आयुक्त मसारे यांनी सांगितले की, बेदाण्याच्या पॅकिंगवर संपूर्ण माहिती अत्यावश्यक आहे. विषबाधा किंवा अन्य गंभीर प्रसंगी ती उपयुक्त ठरेल तसेच जिल्ह्यातील बेदाण्याला राष्ट्रीय व जागतिक पातळीवर ओळख निर्माण करण्यासाठीही गरजेचे आहे. तपासणी मोहीम आणखी तीव्र करणार आहोत.
५५० किलो पेंडखजूर नष्ट केलीदत्त कोल्ड स्टोरेजनेही परवाना घेतला नसल्याचे स्पष्ट झाले. तेथे मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठाही आढळला. बॉक्समधील पेंडखजूरला चक्क कीड लागली होती. पथकाने पेंडखजूरचे प्रत्येकी पाच किलो वजनाचे ११० बॉक्स म्हणजे, ५५० किलो पेंडखजूर नष्ट केली. या पेढीलाही व्यवसाय थांबविण्याची नोटीस देण्यात आली आहे.
कपडे धुण्याच्या पावडरने बेदाणा वॉशिंगसहाय्यक आयुक्त मसारे यांनी सांगितले की, विजय संजय सावंत यांच्या ओमी कॉर्पोरेशनमध्ये बेदाणा वॉशिंगसाठी डिटर्जेंट पावडर वापरली जात असल्याचे आढळले. त्यामुळे पथकाने तेथून बेदाणा व डिटर्जेंट पावडर यांचे नमुने चाचणीसाठी ताब्यात घेतले. ७ लाख ६७ हजार २१० रूपये किमतीचा ४ हजार ५१३ किलो बेदाणा जप्त केला.