सांगली - जिल्ह्यातील नांद्रे-ब्रम्हनाळ नदी काठावर स्तब्ध अवस्थेत मगर आढळून आली होती. मगर हा प्राणी स्तब्ध अवस्थेत असला तरी तो हिंसक असल्याने त्याजवळ जाण्याची हिंमत कुणीही करत नाही. त्यामुळे, ती मगर जिवंत आहे की मेलेली हा पेच ग्रामस्थांपुढे होता. स्थानिकांनी त्या मगरीला काठीने आणि इतर वस्तूंनी डवचून पाहिले होते. मात्र, नेमका अंदाज न आल्याने वनविभागाला पाचारण करण्यात आले. त्यावेळी, वन विभागने नदीकिनारी धाव घेत मगरीची जवळ जाऊन तपासणी केली असता, ती मगर मृत असल्याचे निदर्शनास आले.
नदी काठावर आढळलेली मगर मृत असल्याचे वनविभागाकडून घोषित करण्यात आलं आहे. येथे बारा फुटी मगर आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होत. मात्र, कित्येक तास एकाच ठिकाणी मगर आढळल्यानंतर नागरिकांनी आणि प्राणिमित्रांनी त्याची वनविभागाला कल्पना दिली. वनविभागाने जागेवर जाऊन पंचनामा केला. त्यावेळी, वनविभागाने ती मगर मृत झाल्याचे घोषित केले. मगर ताब्यात घेऊन तिचे शवविच्छेदन केले आणि नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
नदी काठावर आढळलेल्या त्या मगरीच वय १५ वर्षांपेक्षा ज्यास्त असण्याची शक्यता असून प्राथमिक अंदाजानुसार त्या मगरीचा नैसर्गिक मृत्यू झाला, असावा असा अंदाज आहे. तसेच दोन मगरींच्या भांडणात मगरीचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता आहे. मात्र, वनविभागाने अद्याप मृत्यूचे कारण स्पष्ट केलेले नाही. वैद्यकीय 'अहवाल' आल्यानंतर त्याची माहिती मिळणार आहे. मगरीचा एक पंजा तुटलेला आणि जबड्याजवळही बऱ्याच झालेल्या मोठ्या जखमा दिसून आल्या आहेत.