सांगली : महापालिकेने विश्रामबाग, नेमीनाथनगर परिसरातील नागरिकांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प खासगीकरणातून हाती घेतला. पण या योजनेतील नळ कनेक्शनधारकांना वेळेवर पाणी आले नाही. उलट हवेवरच पाण्याची मीटर फिरल्याने त्यांना अव्वाच्या सव्वा बिले देण्यात आली. या बिलांची दुरुस्तीही करण्यात आली नाही. अजूनही चार हजार ग्राहकांकडे अडीच कोटीची थकबाकी आहे.विश्रामबाग व नेमीनाथ नगर परिसरात प्रायोगिक तत्त्वावर खाजगीकरणातून चोवीस तास पाणी देण्याची योजना सुरू करण्यात आली होती. खासगी कंपनीच्या कार्यकाळात हवेने मीटर फिरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. परिणामी जादाची बिले ग्राहकांना मिळाली. कंपनी प्रकल्प महापालिकेच्या ताब्यात देताना १७ लाख २५ हजार रुपये जमा केले.
योजनेतील चार हजार १११ कनेक्शनधारकांची थकबाकी दोन कोटी ५५ लाख इतकी आहे. पाणी तर आलेच नाही, उलट हवेचे बिल ग्राहकांच्या माथी मारण्यात आले. या ग्राहकांना दंड व्याज व सवलतीबाबत वारंवार चर्चा झाली. त्यातून काही जणांचे प्रश्न सुटले. मात्र अजूनही अपार्टमेंटमधील काही ग्राहकांची बिले थकीत आहेत. चुकीच्या बिलामुळे लाखो रुपये दंड व्याज भरावा लागत आहे.
महापौर, आयुक्तांनी लक्ष द्यावेचोवीस तास योजनेतील ग्राहकांच्या थकबाकीचा प्रश्न गंभीर आहे. त्यांच्या बिलात दुरूस्ती करण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेने एक दिवसाचे शिबिर घेऊन त्यांच्या समस्यांचा निपटारा करावा. याबाबत आयुक्त व महापौरांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न निकाली काढावा.- सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच