सांगली : रेल्वे दुहेरीकरणांतर्गत सांगलीच्या चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम गेली महिनाभर थांबले आहे. १० जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण करायची मुदत असताना तितक्या गतीने काम होताना दिसत नाही. त्यामुळे सांगली-माधवनगर रस्त्यावर सतत प्रवास करणाऱ्या तसेच या भागात राहणाऱ्या लाखो सांगलीकरांचा वनवास वाढण्याची चिन्हे आहेत.चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम १० जूनपासून सुरू झाले आहे. १० जानेवारी २०२४ पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची नोटीस रेल्वेने प्रसिद्ध केली होती. या मुदतीत हे काम पूर्ण करायचे होते. १० जूनला बरोबर मध्यरात्रीपासून पूल पाडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण होणार याबाबत नागरिकांना विश्वास वाटला. प्रत्यक्षात हे काम रेंगाळताना दिसत आहे.
या पुलाला पर्यायी म्हणून दिलेले दोन्ही रस्ते नागरिकांसाठी यातनादायी आहेत. त्यामुळे चिंतामणीनगरचा रेल्वे पूल पूर्ण होण्याची प्रतीक्षा नागरिक, वाहनधारक करीत आहेत. दुसरीकडे रेल्वेने हे काम ज्या ठेकेदाराला दिले आहे त्याने गेले महिनाभर काम थांबविल्याचे दिसत आहे. रेल्वेकडून याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. काम थांबले तर मुदतीत ते पूर्ण होणार नसल्याने नागरिकांचा वनवास वाढणार आहे.