सांगली : शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालयाची इमारतीपाठोपाठ आता दिमाखदार पोलिस मुख्यालयाच्या इमारतीमुळे वैभवात भर पडणार आहे. विश्रामबागला सुरू असलेले मुख्यालयाचे काम गतीने सुरू असून, अगदी महिनाभरात ही इमारत पूर्ण होणार आहे. इमारतीचे बांधकाम व अंतर्गत सजावट रचनेबरोबरच आता समोर बगीचाचे काम अहोरात्र सुरू आहे. विश्रामबागला असलेल्या पोलिस मुख्यालयाची इमारत जुनी झाल्याने नवीन इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दीड वर्षापूर्वी यास मंजुरी मिळून काम सुरू झाले. सध्याच्या पोलिस मुख्यालयाच्या इमारतीला कोणताही धक्का न लावता ही इमारत उभारण्यात आली आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याला लागून आता मुख्यालय असणार आहे. विश्रामबाग चौकातून कुपवाड रस्त्यावरील उड्डाणपुलासमोरून मुख्यालयात प्रवेश करता येणार आहे. अधिकाऱ्यांसाठी दालनांसह सुविधानवीन इमारतीत पोलिस अधीक्षक, अप्पर अधीक्षक, गृह विभागाच्या उपअधीक्षकांसह इतर शाखांच्या उपअधीक्षक, पोलिस निरीक्षकांसाठी दालन असणार आहेत. सर्व विभागांचे कामकाज एकाच ठिकाणी व्हावे यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. भव्यदिव्य इमारतपोलिस मुख्यालयाची इमारत पुढील तीस वर्षांचा विचार करून बांधण्यात आली आहे. पाेलिस दलातील कर्मचारी संख्या वाढली, आस्थापनांची रचना बदलली तरी त्यासाठी इमारतीचा वापर होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासारखीच या इमारतीचीही रचना आहे. जागेचा वाद...मुख्यालयात असलेल्या हॉकी मैदानावर ही इमारत उभारण्यात आली आहे. क्रीडाप्रेमींचा त्याला विरोध होता. मात्र, नंतर तो मावळला. मुळात सांगली-मिरज मार्गावर दर्शनी भागातच ही इमारत असणे गरजेचे होते. अधीक्षकांचे निवासस्थान मुख्य रस्त्यावर आणि इतकी चांगली इमारत मात्र आतल्या बाजूला आहे.कोंडीची शक्यताविश्रामबाग चौकात वाहनांची नेहमीच गर्दी असते. उड्डाणपुलापासून चौकापर्यंत वाहनांच्या रांगा असतात. त्यात आता मुख्यालयाचे प्रवेशद्वार झाल्यास वाहतुकीची कोंडी वाढणार आहे. महाराष्ट्रदिनी लोकार्पणमहिनाभरात संपूर्ण इमारतीचे व समोरील सजावटीचे काम पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर लोकार्पण सोहळा होणार आहे. विलंब लागल्यास थेट महाराष्ट्रदिनी कार्यक्रमाची शक्यता आहे.
सांगलीत उभे राहतेय दिमाखदार पोलिस मुख्यालय, महिन्यात काम पूर्ण होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 5:52 PM