सांगली : शेती अथवा शेतीपूरक व्यवसाय केल्यास आपली आर्थिक उन्नती होऊ शकते यासाठी गडचिरोलीच्या तरूणांनी सांगली जिल्ह्यात येवून त्याची माहिती घेतली. भिलवडी (ता. पलूस) येथील चितळे डेअरीला भेट देवून त्यांनी दुग्धव्यवसाय आणि त्यासाठीच्या प्रशिक्षणाची माहिती घेतली. पोलिस दलाच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत गडचिरोली पोलीस दल यांनी गडचिरोली येथील ४५ शेतकरी कुटुंबातील तरुण वर्गाला चांगल्या प्रवाहात आणून त्यांनाही उद्योजक, व्यावसायिक बनवता येईल यासाठी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मिरज येथे सध्या कार्यरत असलेले व काही काळ गडचिरोली येथे काम केलेले पोलिस उपअधीक्षक प्रनील गिल्डा यांनी या प्रकल्पास विशेष सहकार्य केले. यावेळी भिलवडीचे सहायक निरीक्षक नितीन सावंत, आकीब काझी, गडचिरोलीचे उपनिरीक्षक रोशन ओकाटे उपस्थित होते.गडचिरोलीहून आलेल्या या तरूणांना भिलवडी येथील चितळे उद्योग समूहास भेट देण्याचे नियोजन केले. या तरुण वर्गाने शेती त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय कसा करावा व त्यासाठी कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे याची माहिती घेतली. गावी गेल्यावर अशा प्रकारे व्यवसाय करण्यासाठी नक्की प्रयत्न करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.चितळे उद्योग समूहाचे मकरंद चितळे निखिल चितळे यांनी सर्वांचे स्वागत केले. सर्व शेतकऱ्यांना डेअरी व्यवसायाची सखोल माहिती सरव्यवस्थापक शशिकांत कुलकर्णी, डॉ. हरीश इंगळे व डॉ. सी. व्ही. कुलकर्णी यांनी दिली. गडचिरोलीहून आलेल्या तरूणांनीही या प्रकल्पाची माहिती घेत दुग्धव्यवसाय करण्याची इच्छा व्यक्त केली.
गडचिरोलीच्या तरूणांनी ‘चितळें’कडून घेतले दुग्धव्यवसायाचे धडे
By शरद जाधव | Published: October 20, 2023 7:28 PM