सांगली : घरातल्या स्वच्छतेचाही कंटाळा करणाऱ्या लोकांसमोर नवा आदर्श ठेवत सांगलीतील तरुणांनी अखंडित १ हजार ८२५ दिवस म्हणजेच तब्बल पाच वर्षे शहरे व गावांची स्वच्छता केली. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय त्यांनी गलिच्छ वस्त्यांना सुंदरतेचे वरदान दिले. राज्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या पाच जिल्ह्यांनी या अनोख्या मोहिमेला मानवंदना देण्यासाठी १ मे रोजी एकाचवेळी स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.सांगली व परिसरातील काही युवकांनी एकत्र येत निर्धार फाउंडेशनची स्थापना केली. १ मे २०१८ रोजी त्यांनी हाती घेतलेला झाडू आजही त्यांच्या हाती टिकलेला आहे. एक दिवसाचाही खंड न पाडता या तरुणांनी शहरासह जिल्ह्यात, जिल्ह्याबाहेर जिथे शक्य तिथे स्वच्छता मोहीम राबविली.अस्वच्छ परिसर स्वच्छ केले, सेल्फी पॉईंट उभारले, बसस्थानके, दुभाजके, चाैक, स्मशानभूमी अशा अनेक ठिकाणांचे रूपडे त्यांनी पालटविले. राजकीय नेत्यांसह परिसरातील बड्या अधिकाऱ्यांनीही या मोहिमेत सहभाग नोंदवून त्यांच्या कार्याचा गौरव केला. सांगलीतील महापुरानंतर, पंढरपूरच्या यात्रेनंतरची स्वच्छता मोहीम करून त्यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले. त्यांच्या या मोहिमेला यंदा १ मे रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. स्वच्छतेचा हा एक विक्रम आहे.पाच जिल्ह्यांकडून स्वच्छतारूपी मानवंदनानिर्धार फाउंडेशनच्या या स्वच्छता मोहिमेला राज्यातील पाच जिल्ह्यांकडून एकाच दिवशी एकाचवेळी स्वच्छता मोहीम राबवून मानवंदना दिली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर, लातूर, सांगली, कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यांत १ मे रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत स्वच्छता अभियान होणार आहे.
आजी-माजी पालकमंत्र्यांनी केला गाैरवसांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डण्णावर व संपूर्ण टीमला त्यांच्या निवासस्थानी बोलवून शुभेच्छापत्र व पुष्पगुच्छ देत सन्मान केला. तसेच माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही त्यांच्या टीमला संदेश देत गौरविले.
या टीमने नोंदविला विक्रमफाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डण्णावर यांच्यासह अनिल अंकलखोपे, भरतकुमार पाटील, वसंत भोसले, अनिरुद्ध कुंभार, सचिन ठाणेकर, शकील मुल्ला, मनोज नाटेकर, गणेश चलवादे, आदींच्या पथकाने स्वच्छतेचा विक्रम नोंदविला.