इस्लामपूर : सुरूल (ता. वाळवा) येथील शेतकऱ्याने चार एकर शेतीमध्ये दिवस-रात्र राबून मळणी करून ठेवलेल्या अंदाजे ३० हजार रुपये किमतीच्या सात क्विंटल शाळूची चोरी चोरट्यांनी केली. ही घटना ५ मार्चच्या रात्री ते पहाटेदरम्यान घडली.
रणजित प्रकाश पाटील (वय २५) या शेतकऱ्याने मंगळवारी पोलिसात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली. ५ मार्च रोजी त्यांनी ४ एकर क्षेत्रातील शाळू पिकाची कापणी करून दिवसभर मळणी केली. मळणीनंतर २२ क्विंटल शाळूची २२ पोती भरून शेतातच तळवटाने झाकून हे पाटील कुटुंबीय रात्री आठच्या सुमारास घरी परतले होते.
दुसऱ्यादिवशी सकाळी साडेदहाच्यासुमारात रणजित पाटील आई, वडील आणि भावासह शेतामध्ये आले होते. त्यावेळी त्यांना पोत्यावर झाकलेला तळवट बाजूला पडल्याचे दिसून आले. त्यांनी पोती मोजली असता, त्यामध्ये ७ पोती कमी आढळून आली. त्यामुळे चोरट्याने या शाळू पोत्यांची चोरी केल्याची त्यांची खात्री झाली. दोन-तीन दिवस शोध घेऊनही त्याचा माग न लागल्याने रणजित पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली.