फोटो ओळ : चरण (ता.शिराळा) येथील सोंडोली फाट्यावरील धनश्री ट्रेडिंग कंपनी या किराणा दुकानात चोरी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : चरण (ता.शिराळा) येथील सोंडोली फाट्यावर किराणा दुकानात रोख रक्कम व किराणा साहित्यासह ३१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. कोकरुड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
सोंडोली पुलामुळे चरण गावची बाजार पेठ नावारूपास येऊ लागली आहे. यामुळे व्यापारी चरण-सोंडोली फाट्यावर दुकाने सुरू करत आहेत. या ठिकाणी फिर्यादी सोमनाथ पांडुरंग नायकवडी (रा.चरण) यांच्या मालकीचे धनश्री ट्रेडर्स कंपनी हे होलसेल व रिटेल किराणा दुकान आहे. ते रविवारी दुपारी चार वाजता दुकान बंद करून घरी गेले. रात्री चोरट्यांनी दुकानाच्या शटरची पट्टी तोडून दुकानातील रोख १० हजार रुपये, दोन हजार रुपये किमतीची सीसीटीव्हीची हार्डडिस्क व १९ हजार ६०० रुपयांचे इतर साहित्य असा ३१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरी केली. सोमनाथ नायकवडी सोमवारी सकाळी दुकान उघडायला आल्यावर चोरीची घटना निदर्शनास आली. यानंतर, त्यांनी कोकरुड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ अधिक तपास करत आहेत.