सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथील हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून ७ हजारांची रोकड लांबविणाऱ्या चोरट्याला अखेर पोलिसांनी जेरबंद केले. असिफ उस्मान डांगे (वय १९ रा. आरळा, ता. शिराळा) असे संशयित आरोपीचे नाव असून, सांगलीतील मशिदीमध्येही त्याने चोरीचा प्रयत्न केला होता. डांगे याच्याकडून ३० हजार ५२३ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.शहरातील विविध भागात व प्रार्थनास्थळामध्ये चोरीचे प्रकार घडले हाेते. यामुळे सांगली शहर पोलिसांच्या पथकाने गस्त वाढवित चोरट्यांचा शोध सुरू केला होता. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास एक तरुण संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना आढळला. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने बुधगाव येथील हनुमान मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. त्याने चोरी केलेले ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल त्याच्याकडून जप्त करण्यात आले.डांगे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याने यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातही चोरी केली होती. त्याच्याकडून अन्यही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता, त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली.सांगली शहरचे निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक माने, विजय सुतार, गुंडोपंत दोरकर, झाकीरहुसेन काझी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास, पोलिसांनी चोरट्यास केलं जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 1:20 PM