वाळवा : वाळवा येथील ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिरात बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चांदीच्या वस्तूंचा साडेतीन लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. त्याचा तपास लवकर होऊन मुद्देमाल परत मिळावा आणि आरोपींना तातडीने अटक व्हावी, या आशयाचे निवेदन वाळवा ग्रामपंचायतीतर्फे उपसरपंच पोपट अहिर व डाॅ. अशोक माळी यांनी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना दिले.
यावेळी पिंगळे म्हणाले, तपास योग्य त्या दिशेने सुरू असून, लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील. चोरट्यांनी सात किलो चांदीचे मखर, देवीसमोरील भांडी व तबकडी असा ऐवज लंपास केला आहे. लवकरात लवकर चोरट्यांना पकडण्यात यश येईल. यावेळी ग्रामपंचायत सदस्य वाल्मिक कोळी, उमेश कानडे, संदेश कांबळे, सुजित घोरपडे, मानाजी सापकर उपस्थित होते.