सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे सुकुमार आष्टेकर यांच्या शेतात नांगरताना ट्रॅक्टरच्या फाळ्यात सापडलेला बॉम्ब मंगळवारी दुपारी अखेर निकामी करण्यात आला. चार महिन्यांपूर्वी तो सापडला होता. खंडेराजुरी (ता. मिरज) येथील पोलिसांच्या गोळीबार सराव केंद्राच्या मैदानात सांगलीच्या बॉम्बशोधक पथकाने हा बॉम्ब निकामी केला. तो १५ फूट हवेत उडाला. स्फोटाच्या आवाजाने चार-पाच किलो मीटरचा परिसर दणाणला.कवलापुरातील बिसूर रस्त्यावर आष्टेकर यांचे शेत आहे. ३ मार्च २०१६ रोजी शेतात ट्रॅक्टरने नांगरताना ट्रॅक्टरच्या फाळ्यामध्ये हा बॉम्ब आढळला होता. सांगलीतील बॉम्बशोधक पथकाने यंत्रसामग्री व ‘गोल्डी’ श्वानाच्या मदतीने बॉम्बची तपासणी केली. हे स्फोटक जुने असल्याचे स्पष्ट झाले होते. याचा लष्करात वापर केला जातो. चाळीस वर्षांपूर्वीचे हे स्फोटक होते. लष्करामध्ये याचा वापर विमानातून फेकून केला जातो. तसेच बंदुकीमध्येही लोड करून ते वापरले जाते. तशी पाठीमागे सोय होती. आष्टेकर यांच्या शेतात चार फूट खड्डा खोदून हा बॉम्ब ठेवला होता. याठिकाणी २४ तास पोलिसांचा शस्त्रधारी बंदोबस्त होता. परिसरात येण्यास मनाई करण्यात आली होती.सांगलीच्या बॉम्बशोधक पथकाने मंगळवारी सकाळी अकरा वाजता हा बॉम्ब कवलापुरात येऊन ताब्यात घेतला. तत्पूर्वी त्याची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यानंतर तो खंडेराजुरी येथे पोलिस गोळीबार सराव केंद्रावर नेण्यात आला. परिसरात येण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली होती. मिरज ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. दुपारी दोन वाजता तो निकामी करण्यात आला. यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आली होती. तब्बल पंधरा फूट हवेत तो उडाला. यातून काळा धूर निघाला. तब्बल तीन तास ही कार्यवाही सुरू होती. (प्रतिनिधी)बॉम्ब जिवंतबॉम्ब निकामी करताना तो १५ फूट हवेत उडाला. यावरून तो जिवंत होता, हे स्पष्ट होते. ४० वर्षांपूर्वीचा हा बॉम्ब होता, अशी माहिती होती. संकेश्वरमध्येही अशाचप्रकारे २० बॉम्ब चार महिन्यांपूर्वी सापडले होते. तेही तातडीने निकामी केले होते; पण कवलापुरातील बॉम्ब निकामी करण्यासाठी तब्बल चार महिने लागले. बॉम्ब गावातून हलविल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बॉम्ब असल्याने शेतात जाणे धोकादायक बनले होते. त्यामुळे शेती पडीक होती. काटेरी झुडपे उगविली होती.
कवलापुरातील ‘तो’ बॉम्ब अखेर निकामी
By admin | Published: July 06, 2016 12:44 AM