मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री आणि दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे ज्येष्ठ बंधू राजाराम पाटील हे पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. राजाराम पाटील यांच्या सेवानिवृत्तीचा क्षण पोलीस दलातील सहकाऱ्यांसह कुटुंबीयांनाही भावनिक करणारा ठरला. आपल्या कर्तव्यावर सेवेतील शेवटच्या दिवशी जाताना राजाराम हे अतिशय भावूक झाले होते. त्यावेळी, घरातून निघताना आपल्या आईंना त्यांनी सॅल्यूट केला, त्यानंतर, पोलीस ठाणे गाठले.
राजराम यांच्या निवृत्तीवेळी ते करवीरचे पोलीस उपअधीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. सख्खा भाऊ राज्याचा गृहमंत्री असतानाही त्यांनी त्याचा फायदा न घेता प्रकाशझोतात न येता प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले. ३३ वर्षांच्या पोलीस सेवेमध्ये राजाराम पाटील यांना दोन वेळा राष्ट्रपती पदकांसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. आज अखेरच्या दिवशी त्यांनी आपल्या आईला कडक सॅल्यूट ठोकून वर्दीचा निरोप घेतला. चुलते राजाराम पाटील यांच्या सेवानिृत्तीच्या क्षणाबद्दल आर.आर.पाटील यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे युवक नेते रोहीत पाटील यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यामुळे, हा सेवानिवृत्तीचा क्षण आबांच्या आठवणींनी भावूक झाला.
रोहित पाटील यांची भावनिक पोस्ट
आज माझे मोठे चुलते राजाराम (तात्या) पाटील सेवानिवृत्त होत आहेत. व्यक्तिगत माझ्या आयुष्याला बहुतांश आकार आणि शिकवण ज्यांनी दिली त्या तात्यांची आज सेवानिवृत्ती. कुटुंब म्हणून आम्हा सर्वांसाठी हा अत्यंत भावनिक क्षण आहे आणि त्याची पार्श्वभूमी सुध्दा काहीशी तशीच आहे. सुरुवातीच्या काळात भरती पूर्व परीक्षेत पास झाल्यानंतर ज्यावळेस ही बातमी त्यांनी आबांच्या कानावर घातली होती त्यावेळेस आबांच्या डोळ्यातून अश्रू आलेला किस्सा आज सुध्दा सांगताना त्यांचे डोळे भरून येताना मी पाहिलं आहे.
रोहित पाटील यांनी म्हटलं आहे की, घरचा पहिलाच सरकारी पगार असलेली व्यक्ती म्हणून आबांना सुध्दा नेहमी त्यांचा अभिमान होता. आबा गृहमंत्री असताना कधीही गृहमंत्र्यांचे भाऊ म्हणून न मिरवता त्यांनी काम केले आणि नेहमीच त्यांनी ते अंतर ठेऊन काम केले. सेवेतला बहुतांश काळ हा साईड पोस्टिंग मध्येच काम त्यांनी केले आणि कधीही आबांकडे त्यांनी कोणती मागणी केली नाही हे मात्र अगदी ठळकपणे सांगायला मला आवडेल. कधी कधी त्यांच्या सेवा काळाबद्दल विचार केला तर गृहमंत्र्यांचे भाऊ म्हणून काम करताना त्याचे काही तोटे सुध्दा असू शकतात हे लक्षात येतं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना त्यांनी तयार केलेला लोकांचा संग्रह आणि तेथील लोकांना त्यांच्याबद्दल असणारी आपुलकी हीच त्यांच्या कामाची पोच पावती आहे असं मला नेहमी वाटतं. आज सेवेत असताना शेवटचे ऑफिसकडे जाताना त्यांना खूप कष्ट करून शिकवलेल्या माझ्या आज्जीला सॅल्यूट करून ते रवाना झाले. आर आर आबांचा मुलगा म्हणून जेवढा अभिमान आहे तितकाच आभिमान डी.वाय.एस. पी आर आर तात्यांचा पुतण्या म्हणून आहे आणि राहील एवढच आजच्या दिवशी मला त्यांना सांगायचंय, असं रोहित पाटील यांनी म्हटलं आहे.