इस्लामपूर - अधिक हातांना काम देण्यासाठी नवीन नवीन धोरणं आखली पाहिजेत परंतु हे सरकार धोरणही ठरवत नाही. शेतकरी, शिक्षित तरुणांना न्याय नाही मग हे सरकार कुणासाठी चालवता असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला केला. इस्लामपुर - वाळवा मतदारसंघातून आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या जाहीर सभेला शरद पवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले की, मी अनेक निवडणुका पाहिल्या आहेत परंतु ही निवडणूक महत्त्वाची असून महाराष्ट्रातील तरुण पिढी चमत्कार करून दाखवणार आहे. या देशात, राज्यात कष्टकरी, घाम गाळणारा बळीराजा, शेतकरी यांच्या दु:खाकडे दुर्लक्ष करणारे हे सरकार आहे. यांना शेती उत्पादनाशी काहीही देणेघेणे नाही असा घणाघात त्यांनी केला.
तसेच मोठया उद्योगपतींनी जी कर्ज थकवली आहेत त्यामुळे अनेक बॅंका अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने ८६ हजार कोटी रुपये त्या बॅंकांमध्ये भरले आहेत. आज देशात आणि राज्यात त्यामुळे आत्महत्या वाढल्या आहेत. अशा लोकांच्या हातात पुन्हा सत्ता देणार का? असा सवाल शरद पवार यांनी जनतेला केला.
देशाच्या समोरचे महत्वाचे प्रश्न कोण मांडायला तयार नाही. निव्वळ ३७० कलम, काश्मीरमध्ये काय काय केले, पुलवामा सांगतात. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन भावनेला हात घालत आहेत. अतिरेकी कारवायांचा खात्मा करा. आमचा पाठिंबा आहे. जगात सुंदर काश्मीर आहे. गुलामनबी आझाद यांनी आज निवेदन दिल्याचे सांगतानाच काश्मीरमध्ये शांतता आहे ठिक आहे परंतु ती स्मशानशांतता आहे. दुकाने, व्यापार बंद आहेत. घरं कशी चालवायची ही चिंता तिथल्या लोकांना सतावत आहे. रस्त्यावर कोण फिरणार नाही हे बघणं म्हणजे आम्ही खुप काही कर्तृत्व केलं हे सांगणं योग्य नाही असा टोलाही शरद पवारांनी लगावला.
राजकारणात विरोधकांना नाउमेद करण्याचे काम होत आहे. मी शिखर बॅंकेचा डायरेक्टर किंवा सभासद नसतानाही ईडीच्या गुन्हेगारी यादीत माझं नाव आलं. अहो आमच्या बापजादयानेही कधी गुन्हेगारी केली नाही. शिखर बॅंकेत ७० जणांचा समावेश आहे. त्यात भाजप, सेना यांची लोकं आहेत. ईडीच्या नावाने काय कारवाई करायची ती करा त्याची चिंता आम्हाला नाही अशा खूप कारवाया पाहिल्या आहेत असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की खटला चालवा. गुन्हा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा,हे निर्देश सुप्रीम कोर्टाला द्यावे लागतात आणि आम्ही गुन्हेगार नसताना ईडीत आमचे नाव येते, ही दडपशाही नाही का? असा सवालही त्यांनी केला.
यावेळी शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कामाचे भरभरुन कौतुक करतानाच त्यांच्या पाठीशी खंबीर उभे रहा असे आवाहनही केले. दरम्यान ज्यांच्या हातात सत्ता आहे ती काढून घेवून माणुसकीने सत्ता कशी चालवायची हे दाखवून देवूया असे आवाहनही शरद पवार यांनी केले.